Wed, Jul 24, 2019 07:53होमपेज › Sangli › येळावीत तरुणीला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न

येळावीत तरुणीला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 11:29PMतासगाव ः शहर प्रतिनिधी

येळावी (ता. तासगाव) येथे नवविवाहित तरुणीला चारित्र्याचा संशय व घरपट्टी भरण्यासाठी दहा हजार रुपये आणावेत यासाठी पतीने  मारहाण केली. तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये ती भाजून गंभीर जखमी झाली आहे. 

याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात मयुरी दीपक सुवासे (वय 20, रा. येळावी) यांनी फिर्याद दिली आहे. पती दीपक जयसिंग सुवासे (वय 23) याला अटक करण्यात आली आहे. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मयुरी व दीपक यांचा विवाह दि. 30 डिसेंबर रोजी झाला होता. लग्‍नानंतर दोन महिने दोघे सुखात होते. यानंतर त्यांच्यात चारित्र्याच्या संशयावरुन वादावादी सुरू झाली. 

अनेकवेळा दीपक मयुरीला संशयावरुन शारिरीक, मानसिक छळ करुन त्रास देत असे. काही दिवसांपासून दीपकने मयुरीला ‘तुझ्या आजीकडून घरपट्टी भरण्यासाठी दहा हजार रुपये घेऊन ये’, म्हणून त्रास देण्यास सुरूवात केली होती.  मयुरीने नकार दिला होता.

रविवारीही याच कारणावरुन दोघांमध्ये वादावादी झाली.  दीपकने मयुरीच्या अंगावर रॉकेल टाकून काडी लावली. यामध्ये मयुरी भाजून गंभीर जखमी झाली. तासगाव पोलिसांनी त्वरीत दीपकला अटक केली असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले करीत आहेत.

Tags : sangli,  Burning, woman Trying, to kill, sangli news,