होमपेज › Sangli › सांगलीत घरफोड्यांचा धुमाकूळ!

सांगलीत घरफोड्यांचा धुमाकूळ!

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 8:55PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात एक जानेवारीपासून 30 नोव्हेंबरअखेर एक हजाराहून अधिक जबरी चोरी, घरफोड्या झाल्याचे दिसून येते. यामध्ये चोर्‍यांचे सर्वाधिक प्रमाण सांगली शहरात असल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरात घरफोड्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. अलिकडच्या काळात बंद घरे, फ्लॅट, बंगले यांनाच चोरट्यांनी टार्गेट केेले आहे. वाढत्या चोर्‍यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे. 

बंद घरांची माहिती मिळते कशी?

एखाद्या अपार्टमेंटमधील फ्लॅट बंद आहे किंवा एखादे घर, बंगला बंद आहे याची माहिती चोरट्यांना मिळतेच कशी, हा संशोधनाचा विषय आहे. केवळ अर्ध्या तासासाठी बंद असलेले घर फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घरांची माहिती काढण्यासाठी चोरटे नेमकी कोणती पद्धत वापरतात, याचाही पोलिसांनी तपास करण्याची गरज आहे. त्याशिवाय यामध्ये कोणाची मिलीभगत आहे, याचाही पर्दाफाश होण्याची गरज आहे. अनेकदा टीप देऊन चोरी करायला सांगितले जाते. 

गस्त पथके नावाला, बीट मार्शलचेही दर्शन दुर्लभ

प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या हद्दीत रात्रीच्या गस्तीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय वरिष्ठ अधिकार्‍यांनाही नाईट ड्युटी कंपलसरी करावी लागते.  रात्री उशिरा शहरात फेरफटका मारला तरी गस्तीची गाडी कधीच दिसून येत नाही. हीच अवस्था बीट मार्शलचीही आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटणार्‍या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेले बीट मार्शल आडबाजूलाच थांबून असल्याचेच दिसून येतात. त्यांचा वावर केवळ प्रमुख रस्त्यांवरच असतो त्यामुळे उपनगरांतील आतील भागात चोर्‍या वाढत आहेत. अशा परिस्थितीमुळे पोलिस मुख्य रस्त्यावर आणि चोरटे उपनगरांतील आतील भागात, असेच चित्र सध्या आहे. 

त्या सराफांचे लायसन्स रद्द करण्याची गरज

चोरीतील सोने, दागिने विकत घेणार्‍या सराफांवर कारवाई करण्याची गरज आहे. यासाठी सराफ असोसिएशननेच पुढाकार घेण्याची गरज आहे. चोरीचे दागिने विकत घेणार्‍या सराफांचे लायसन्स रद्द करण्यासाठी असोसिएशनने पुढाकार घेतला पाहिजे. तरच अशा प्रकारांना आळा बसेल. चोरट्यांना दागिने विक्रीत अडचण आल्याशिवाय या घटनांना आळा बसणार नाही.

तडीपारीचे 160 प्रस्ताव प्रलंबित

जिल्हा पोलिस दलाकडून तडीपारीचे 160 प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये बहुसंख्य चोरट्यांचा समावेश आहे. मात्र ते प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असल्याने रेकॉर्डवरील चोरट्यांचा जिल्ह्यात मुक्त वावर आहे. पोलिसांकडून रेकॉर्डवरील चोरट्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. तरीही चोर्‍यांचे प्रमाण वाढत आहे. न्यायालयात चोरट्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी जामिनावर आल्यानंतर किंवा शिक्षा भोगून आल्यानंतर या चोरट्यांच्या कारवाया पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. 

चेन स्नॅचिंगने महिलांत घबराट

चेन, बॅग, रोकड लंपास करण्यासह मोटारीच्या काचा फोडून आणि मोटारसायकलच्या डिकीतून रोकड लंपास करणारी टोळी या सक्रिय राहिल्याचे दिसून आले. काही चेन स्नॅचरना अटकही करण्यात आली. मात्र सांगली, मिरज शहरात होणारे असे गुन्हे अद्यापही घडत आहेत. त्यातच शहरात विशेषः कोल्हापूर रस्त्यावर वाटमारीचे प्रमाण वाढले आहे. त्याने पोलिसांसमोर चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍यांचा कायमचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

अधीक्षक शर्मा शुद्धिकरण करणार का?

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी नुकताच कार्यभार घेतला आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अतिरिक्त अधीक्षक म्हणून काम करताना प्रभावी काम केले आहे, त्यांचा तो लौकिक ते सांगली जिल्ह्यातही कायम ठेवतील, अशी अपेक्षा आहे. शहरातील पोलिस ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांवर कारवाई करून तसेच कार्यक्षम अधिकार्‍यांची नेमणूक करून शहरातील पोलिस ठाण्यांचे शुद्धिकरण अधीक्षक शर्मा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

चोरट्यांवर मोक्कांतर्गत कारवाईत अडथळा

विविध प्रकारच्या चोर्‍यांमध्ये अटक केलेल्या गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करताना अडचणी येत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. खुनासह दरोडा किंवा सशस्त्र दरोडा, चेन स्नॅचिंग यामधील गुन्हेगारांवर मात्र मोक्कांतर्गत कारवाई करता येते. त्याचे प्रस्तावही मंजूर होतात. मात्र अन्य चोर्‍यांतील गुन्हेगारांविरोधात असे प्रस्ताव टिकत नसल्याने पोलिस त्या कारवाईसाठी प्रयत्न करीत नाहीत. मात्र या चोरट्यांवर तडीपारीची कारवाई करणे शक्य आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही बसविण्याची गरज

नागरिकांनीच आता चोर्‍यांना आळा घालण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. परगावी जात असताना काही दिवसांसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे. त्यासाठी पैसे खर्च होतील, मात्र घराची सुरक्षितता राहील. त्याशिवाय अपार्टमेंट, बंगले यांच्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे.