Mon, Sep 24, 2018 05:15



होमपेज › Sangli › सांगलीत बंद घर फोडले

सांगलीत बंद घर फोडले

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 11:03PM

बुकमार्क करा





सांगली : प्रतिनिधी

शहरातील शंभर फुटी रस्त्यालगत असणार्‍या आप्पासाहेब पाटीलनगर येथील एक बंद घर फोडून चोरट्यांनी सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 27 हजारांची रोकड असा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. दि. 23 डिसेंबरनंतर ही घटना घडली. यावेळी चोरट्यांनी सोने खरेदीच्या पावत्याही नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत  माजी सैनिक सलीम बादशाह समलेवाले (वय 38) यांनी फिर्याद दिली आहे. आप्पासाहेब पाटीलनगरमध्ये समलेवाले पत्नी, दोन मुलांसमवेत राहतात. त्यांच्या शेजारी त्यांचा भाऊ बालेखानही राहतो. मुलांना नाताळची  सुट्टी असल्याने ते दि. 23 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुटुंबासह सराटी (ता. कवठेमहांकाळ) येथे आई-वडिलांकडे गेले होते. मंगळवारी दुपारी त्यांचा भाऊ बालेखान यांना त्यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

चोरट्यांनी कटावणीने कडी तोडून घरात प्रवेश केल्याचे दिसून आले.  बेडरूममधील कपाट तोडून त्यात ठेवलेला तीन तोळ्यांचा राणीहार, दोन तोळ्यांचा नेकलेस, 5 ग्रॅमची अंगठी, प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन चेन, 5 ग्रॅमची कर्णफुले,  पैंजण व 27 हजारांची रोकड असा ऐवज लंपास केल्याचे दिसून आले. विश्रामबाग पोलिसांनी पंचनामा केला आहे. ठसे तज्ज्ञांनी ठसेही घेतले आहेत. यावेळी श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र घरापासून काही अंतरावर जाऊन श्‍वान तेथेच घुटमळले.