Tue, Jul 16, 2019 01:45होमपेज › Sangli › अस्सल माणदेशी खिलार वाणाचा लाख मोलाचा राजा!

अस्सल माणदेशी खिलार वाणाचा लाख मोलाचा राजा!

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 10:46PMमातीतलं सोनं : विवेक दाभोळे

दारी खिलारी बैलाची जोडी..शेतात  मजल्याची माडी..! हे चित्र आता जरी दुर्मिळ होत असले, ग्रामीण भागात बैलजोड्यांची संख्या जरी कमी होत असली तरी देखील अवतीभवती सिमेंटच्या जंगलात देखील कुस्तीचा नाद जोपासत कृष्णाकाठच्या एका जिगरबाज कुस्तीगीराने सांगलीत लाख मोलाच्या अस्सल माणदेशी खिलार बैलाचे संगोपन केले आहे. आज या बैलास बाजारात लाखो रुपयांची बोली येत आहे.  नोकरीसाठी गावपांढरीपासून दूर रहावे लागले तरी यातून त्यांनी गावपणाची नाळ कायम राखली आहे.

जातीवंत माणदेशी खिलार वाण आता दुर्मिळ होऊ लागला आहे. खिलार बैलजोड्या आहेत, पण खिलार वाणाचा जिथे उगम झाला त्या माणदेशीपणाचा बाज कायम राखणारा माणदेशी खिलार वाणाचा बैल मात्र तसा दुर्मिळच! पण हाच माणदेशी खिलार बैल आज पैलवान मन्सूर यासीन मुल्ला यांच्या सांगलीतील दावणीला शोभून दिसत आहे. 

नागठाणे हे मन्सूर यासीन मुल्ला यांचे गाव! वडील हेडमास्तर आणि मन्सूरभाई स्वत: एस. टी. तील नोकरीनिमित्त सांगलीत असले तरी त्यांनी शेतीवाडीचा आणि गावपणाचा बाज कायम राखला आहे. पैलवानी शरीरयष्टीचे मुल्ला यांना बैलजोड्यांचा नाद परंपरागतच!  कुस्ती खेळतानाच बैलांशी खेळत त्यांनी कुस्तीतही नाव कमावले. 

साडेआठ महिन्यांपूर्वी त्यांना एखादा हिरा गवसावा तसा पंढरपूरच्या वारीत इंदापूर येथील एका शेतकर्‍याकडून अस्सल माणदेशी खिलार वाणाचा खोंड गवसला. हाच राजा!
माणदेशी खिलार वाणाची या राजात सारी लक्षणे आहेत. शिंगे, डोळे, पापण्या आणि पापण्यांचे केस, जीभ, खूर काळे असणे हे माणदेशी खिलारचे मुख्य लक्षण आणि हेच लक्षण हा राजा अभिमानाने मिरवितो आहे.
जेमतेम अठ्ठावीस महिने वयाचा हा राजा तब्बल सहा फूट उंचीचा आहे. तो जेव्हा आठदाती होईल त्यावेळी त्याची उंची आणि लांबी सात ते साडेसात फूट होईल.मुल्ला यांनी देखील या राजाची एखाद्या राजासारखीच बडदास्त ठेवली आहे..आणि राजाने देखील खाल्लेल्या भाकरीशी इनाम राखले! सकाळी दिलेला शब्द माणूस संध्याकाळी पाळत नसल्याच्या सध्याच्या काळात राजाने मन्सूर यांना लळा लावला आहे. गारपीर चौक परिसरात तर या राजाची चांगलीच चर्चा होताना दिसते.  

राजाने गेल्या आठ महिन्यात सांगली, इस्लामपूर, जत, खरसुंडी, कोल्हापूर, एकसंबा येथे महानंदी किताब, बेळगाव आदी ठिकाणचे एकही पशुपक्षी प्रदर्शनाचे मैदान चॅम्पियनशीप घेतल्याखेरीज सोडलेले नाही. आता तर खास ‘ब्रिडींग’साठी राजाला मागणी येत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यांनी, या क्षेत्रातील जाणकारांनी राजाच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकलेली आहे. हजारोंची बक्षिसे मिळवून राजाने मालकाने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविला आहे. आदत असताना राजाने हे यश मिळविले आहे हे उल्लेखनीय ठरत आहे. आज हा ‘राजा’ मुल्ला यांच्या घरचाच घटक बनला आहे. कुटुंबियातील सार्‍यांनाच राजाचा लळा लागला आहे. आज या राजाला तब्बल आठ लाख रुपयांना मागणी आली आहे.  तरी देखील मुल्ला यांनी राजाला विकण्याचा विचार देखील मनात आणलेला नाही. राजाला कधी विकणार नाही असेच ते म्हणतात. ‘जो पर्यंत शेर आहे तोपर्यंत राजा माझ्या दावणीला’ असे ते सांगतात तेव्हा त्यांच्या नजरेतील राजाबद्दलची जिव्हाळ्याची भावना चमकल्याखेरीज राहत नाही.