Thu, Apr 25, 2019 08:04होमपेज › Sangli › पेट्रोल चोरणार्‍या दोघांना अटक

पेट्रोल चोरणार्‍या दोघांना अटक

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 12:07AMसांगली : प्रतिनिधी

भिलवडी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या एका तबेल्यात टँकरमधील पेट्रोल, डिझेल चोरताना दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. टँकरचालक दिलीप राजू मंडले (वय 45, रा. लोढे, ता. तासगाव), प्रमोद सुरेश थोरात (वय 26, रा. भिलवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई करून चोरलेल्या पेट्रोल, डिझेलसह टँकर असा 19 लाख 90 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.  

भिलवडी स्टेशनजवळ प्रमोद थोरातचा घोड्यांचा तबेला आहे. हजारवाडी येथील डेपोतून भरून आलेल्या टँकरमधील पेट्रोल, डिझेलची चोरी येथे केली जात असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक राजन माने यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास थोरातच्या तबेल्यावर छापा टाकला. त्यावेळी दोघेही संशयित टँकरमधून (एमएच 10 झेड 4200) इंधन काढून घेत असताना रंगेहाथ सापडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर मंडले त्याच टँकरवर चालक म्हणून काम करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी चोरलेले 50 लिटर पेट्रोल आणि 50 लिटर डिझेल जप्त करण्यात आले. चोरीसाठी वापरलेली पाईप, एक लोखंडी हातपंप, दहा लिटरचे माप, वीस लिटरचे कॅन, बॅरेल असे साहित्यही जप्त करण्यात आले. दोघांनाही चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंतम खाडे, सागर पाटील, अशोक डगळे, निलेश कदम, मच्छिंद्र बर्डे, सचिन कनप, चेतन महाजन, उर्मिला खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

सहा महिन्यांपासून करत होते चोरी...

मंडले चालक असलेला टँकर धामणी (ता. मिरज) येथील एकाचा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मंडले आणि थोरात भिलवडी स्टेशनजवळ असलेल्या तबेल्यात पेट्रोल, डिझेलची चोरी करत होते. भिलवडी परिसरात त्याची कमी किमतीत विक्री केली जात होती. या दोघांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोघांकडे कसून चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक माने यांनी सांगितले.