Tue, Mar 26, 2019 12:04होमपेज › Sangli › सुट्टीमुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल

सुट्टीमुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 06 2018 12:21AMमिरज : जे. ए. पाटील

सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू असल्याने लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस, सुपरफास्ट, हमसफर इत्यादी गाड्यांचे 15 जूनपर्यंतचे आरक्षण फुल्ल आहे. त्यामुळे चोवीस तास आधी मिळणार्‍या तत्काळ, प्रीमियम तिकिटासाठी प्रवाशांना अवलंबून रहावे लागत आहे.   

मिरज स्थानकातून दररोज तसेच आठवड्यातून एकदा, दोनदा धावणार्‍या पॅसेंजर, एक्स्प्रेस, सुपरफास्ट, हमसफर एक्स्प्रेस गाड्यांची संख्या जवळपास 70 ते 75 इतकी आहे.  दीडशे ते तीनशे किलोमीटर अंतरापर्यंत धावणार्‍या सर्व पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्यांना आता प्रवाशांची  मोठी गर्दी असते. गोवा, कर्नाटक राज्यातून मुंबई, दिल्ली, अजमेर, जोधपूर, गांधीधाम, उदयपूर, हबीबगंज (भोपाळ), गंगानगर, गांधीधाम, अहमदाबादकडे जाणार्‍या एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण 15 जूनपर्यंत फुल्ल आहे. प्रवाशांना सर्वसाधारण आरक्षण मिळत नाही. त्यामुळे चोवीस तास आधी निघणार्‍या तत्काळ, प्रीमियम तत्काळच्या तिकिटासाठी प्रवाशांना वेटिंगवर रहावे लागते. तसेच जादा पैसेही मोजावे लागतात.

मुंबईला जाण्याकरीता हुबळी-कुर्ला, तिरुनेलवेल्ली-दादर, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी व सह्याद्री एक्स्प्रेस या चार गाड्या उपलब्ध असूनही प्रवाशांना  तिकिटासाठी वेटिंगवर रहावे लागते.  दिल्लीकडे जाण्याकरीता वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस या दररोज धावणार्‍या गाडीबरोबरच यशवंतपूर-चंदीगढ, यशवंतपूर-निजामुद्दीन, म्हैसूर-निजामुद्दीन कोल्हापूर-निजामुद्दीन अशा आठवड्यातून सहा गाड्या धावतात. त्यामुळे दिल्लीकडे जाणार्‍याकरीता एक दिवस वगळता दररोज दोन गाड्या उपलब्ध आहेत.  यशवंतपूर, बेंगलोर येथून गुजरात, राजस्थानकडे  अजमेर, जोधपूर, गांधीधाम या गाड्या होत्या. या गाड्यांचे आरक्षण  फुल्ल  असल्याने काही महिन्यापासून गंगानगर - तिरुचेरापल्ली,   उदयपूर-म्हैसूर पॅलेस या दोन  एक्स्प्रेस  सुरू करण्यात आल्या आहेत.