Tue, Jun 18, 2019 21:09होमपेज › Sangli › बोअर खोदाईत मशीन मालकांकडून शेतकर्‍यांची लूट

बोअर खोदाईत मशीन मालकांकडून शेतकर्‍यांची लूट

Published On: Mar 23 2018 2:00AM | Last Updated: Mar 22 2018 10:19PMसांगली : प्रतिनिधी

मशीन मालकांकडून कूपनलिका ( बोअर) एका खोदाईचे डबल बिल आकारुन शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. ती त्यांनी थांबवावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना बोअर  मशीन मालकांना झोडपून काढेल. तसेच याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करुन परवाने रद्द करण्याबरोबर मोठा दंड आकारण्याबाबत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी दिला आहे. 

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात खराडे यांनी म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे कूपनलिका खोदाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दुष्काळी तासगाव,  कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर यासह अन्य तालुक्यात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पाण्याची टंचाई जाणवते. त्यामुळे कूपनालिका खोदण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही खोदाई करताना केसिंग खोदाई आणि कूपनलिका खोदाई याचे  स्वतंत्र दर लावले जातात, यात शेतकर्‍यांना फसवले जात आहे. समजा  200 फूट   खोदल्यास  50 ते 55 रुपये प्रतिफूट याप्रमाणे 200 फुटांचे पैसे शेतकर्‍यांकडून घेतले जातात. या खोदाईतच  केसिंग बसविले जाते. त्यासाठी वेगळी खोदाई केली जात नाही, पण केसिंग खोदाईचे  पैसे मात्र वेगळे घेतले जातात. 

एकाच खोदाईचे दोनदा पैसे घेवून  शेतकर्‍यांना लुटले जात आहे. त्याचबरोबर केसिंग पाईप खरेदीतही शेतकर्‍यांनी फसविले जाते. आयएसआय मार्क केसिंग पाईप बसवतो, असे सांगून 300 ते 350 रूपये प्रतिफूट या प्रमाणे दर आकारला जातो. प्रत्यक्षात मात्र लोकल ब्रँडची केसिंग पाईप बसविली जाते. ही लूट आणि फसवणूक बोअर मशीन मालकांनी थांबवावी. अन्यथा त्यांना झोडपून काढू. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात येणार आहे. असा प्रकार आढळल्यास  मशीन जप्त करण्याबरोबर मोठा दंड करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटना करणार आहे.  

Tags : Sangli, Sangli News, Boer dug machine, Plunder, the farmer, from, owner,