Mon, Dec 09, 2019 10:52



होमपेज › Sangli › इस्लामपुरात फेसाळलेल्या काळ्या पाण्याचा पुरवठा

इस्लामपुरात फेसाळलेल्या काळ्या पाण्याचा पुरवठा

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 12:22AM



इस्लामपूर : प्रतिनिधी

शहरातील पूर्व भागातील 7 ते 8 नगरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून फेसाळलेल्या काळ्या पाण्याचा पालिकेकडून पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्‍त झाले आहेत. काविळीच्या साथीला पालिकेचा पाणीपुरवठा विभागच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक शकील सय्यद यांनी केला आहे. 

शहरातील यशोधननगर, शाहूनगर, कारखाना कॉलनी, गजानन महाराज कॉलनी, एकता कॉलनी, केएनपी नगरसह आदी भागांत गेल्या तीन महिन्यांपासून पालिकेकडून फेसाळलेल्या काळ्या पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काविळीच्या साथीने थैमान घातले होते. गेल्या काही दिवसांपासून ही साथ आटोक्यात आली असली तरी  काविळीचे तुरळक रुग्ण अजूनही शहरात आहेत. पालिकेच्या  पाणीपुरवठा विभागाला या परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा निवेदन दिले आहे. परंतु पाणीपुरवठा विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही, असे नगरसेवक शकील सय्यद यांनी सांगितले. फेसाळलेल्या पाण्यासंदर्भात नागरिकांनी अनेकवेळा लेखी व तोंडी सूचना देवूनही पालिका पाणीपुरवठा विभाग भुयारी गटरचे कारण सांगून नागरिकांना परत पाठवित आहेत. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेनेच्यावतीने आंदोलन करू, असा इशारा सय्यद यांनी दिला. 

यशोधननगरमध्ये काविळीचे रुग्ण...

गेल्या अनेक दिवसांपासून यशोधननगर, शाहूनगर परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्याचा गटारीसारख्या पाण्याचा वास येत असून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला नागरिकांच्या आरोग्याबद्दल कोणतेही सोयरसुतक राहिले नसून या परिसरातील नागरिक व महिला आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असे माजी नगरसेवक युवा नेते शिवाजी पवार यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाने परिसराचा सर्व्हे करून ज्या ठिकाणी पाण्याच्या पाईपांना गळती आहेत त्या काढून घ्याव्यात. अशी मागणी शिवाजी पवार यांनी केली आहे.