Sun, Sep 23, 2018 06:06होमपेज › Sangli › मिरजेत विवाहितेवर जादूटोणा  

मिरजेत विवाहितेवर जादूटोणा  

Published On: Jul 02 2018 1:48AM | Last Updated: Jul 02 2018 12:38AMमिरज : शहर प्रतिनिधी

घरात शांती मिळावी व आजारपण जावे यासाठी मिरजेत एका विवाहितेवर जादूटोणा करून औषध पाजण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी विजापूरचा मांत्रिक, विवाहितेची सासू रुक्मिणी पवार (रा. खोतनगर, मिरज) व शंकर चुनांडे (रा. भोर) या तिघांविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.    

याबाबत पूजा आबासाहेब पवार (वय 25, सध्या खोतनगर, मिरज, मूळ रा. सातारा) या विवाहितेने तक्रार दिली आहे. पूजाचा विवाह दोन वर्षांपूर्वी आबासाहेब याच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. घरामध्ये शांती मिळावी व पूजा हिचा आजार जावा, असे कारण पुढे करून जानेवारी 2018 मध्ये तिची सासू रुक्मिणी पवार व रुक्मिणीचा भाऊ शंकर चुनांडे या दोघांनी एका मांत्रिकाद्वारे जादूटोणा केला.
विजापूरच्या एका मांत्रिकाला घरी बोलावले. त्या मांत्रिकाने पूजावर तंत्र-मंत्र करून लिंबूपाणी पिण्यास दिले. त्यानंतर एक औषध पिण्यास दिले. त्यानंतर मात्र पूजा ही वारंवार आजारी पडत गेेली. तिची आजही

प्रकृती गंभीर आहे. ती सध्या माहेरी राहण्यास गेली आहे. तिथेच रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिने तिच्या भावाच्या मदतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आज पोलिसांनी मांत्रिक, पीडित विवाहितेची सासू रुक्मिणी पवार, सासूचा भाऊ शंकर चुनांडे या तिघांविरुद्ध महानरबली व इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.