Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Sangli › जतमध्ये बस, ट्रक पेटविला, दगडफेक

जतमध्ये बस, ट्रक पेटविला, दगडफेक

Published On: Jan 04 2018 1:03AM | Last Updated: Jan 03 2018 11:36PM

बुकमार्क करा
जत: प्रतिनिधी

भीमा- कोरेगाव घटनेचे तालुक्यात जोरदार पडसाद उमटले. मंगळवारी मध्यरात्री रामपूर फाट्यावर एक बस  आणि  सोलनकर चौकात ट्रक पेटविण्यात आला. शहरात पोलिस गाडीसह अनेक वाहनांवर दगडफेक झाली. शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. आणखी दोन बस फोडण्यात आल्या. सुमारे दहा लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

भीमा- कोरेगाव प्रकरणानंतर मंगळवारी तालुक्यात तणावाचे वातावरण होते. रात्री साडेआकरा वाजता जत-सांगली रस्त्यावर जत-सांगली ही बस अडविण्यात आली. बसमधील चालक, वाहक व सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर ही बस पेटवून देण्यात आली.  पोलिस उपअधीक्षक नागनाथ वाकुडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कर्मचार्‍यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र बसमधील आतील सर्व भाग जळून खाक झाला.

काही वेळानंतर सोलनकर चौकात तूर वाहतुक करणारा ट्रक पेटविण्यात आला. वाकुडे व पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. टँकर बोलावून आग विझविण्यात आली. त्यामुळे मोठी वित्तहानी टळली. याच दरम्यान, शहरात आंबेडकरनगर, छत्रीबाग रोड याठिकाणी अनेक खासगी वाहनांवर दगडफेक झाली. आंबेडकरनगर येथे गस्त घालणार्‍या पोलिस गाडीवरही दगडफेक झाली.

शहरात कडकडीत बंद

शहरात बुधवारी बंदला प्रतिसाद मिळाला. सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. आंदोलकांच्या भीतीने आगारातून जाणार्‍या सर्व बसच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या. तालुक्यातील वडाप वाहतूकही बंद ठेवण्यात आली. आरपीआयचे पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे, माजी आमदार मधुकर कांबळे तसेच पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी शहरात शांततेचे आवाहन केले. दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

तालुक्यातील अनेक गावांत बंद

तालुक्यातील अनेक गावांत  बंदला प्रतिसाद मिळाला. डफळापूर येथे सर्व व्यवहार बंद ठेवून भीमा कोरेगावच्या घटनेचा निषेध करण्यात आला. बिळूरमध्ये दुपारपर्यंत बंद पाळण्यात आला. उमराणी, संखमध्येही काही काळ व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.