होमपेज › Sangli › तोडफोड करणार्‍यांविरुद्ध गुन्हे

तोडफोड करणार्‍यांविरुद्ध गुन्हे

Published On: Jan 04 2018 1:03AM | Last Updated: Jan 03 2018 11:52PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या सांगली बंदला बुधवारी  हिंसक वळण लागले. मारुती चौकातील फलकावर दगडफेक करून तो फाडल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आंदोलक आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अज्ञातांकडून बंदला प्रतिसाद न देणारी पंचवीसहून अधिक दुकाने फोडण्यात आली, तर रस्त्यावर लावलेल्या चारचाकी गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. 

भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. मंगळवारी रात्री सर्वपक्षीय कृती समितीने बैठक घेऊन शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले होते. बुधवारी सकाळी नऊपासूनच कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमू लागले. कार्यकर्त्यांचे समूह शहरातून बंदचे आवाहन करीत पुतळ्याजवळ दाखल होत होते. 

सकाळी दहा वाजल्यापासून या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली होती. सकाळी सहापासूनच पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. कार्यकर्त्यांची संख्या वाढल्यानंतर पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या निषेधासह भीमा-कोरेगाव, वढू बुद्रुक येथील घटनेतील जबाबदार व्यक्‍तींविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास जमाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाला. 

बाराच्या सुमारास हजारोंचा जमाव मारुती चौकात आला. तेथे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा फलक पाहून जमाव आक्रमक झाला. पोलिस त्यांना सातत्याने शांततेचे आवाहन करीत होते. मात्र, फलक काढण्यावर जमाव ठाम राहिला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक तेथे बोलावून घेतले. पथक आल्यानंतर अज्ञातांनी फलकावर दगडफेक केल्याने फलक फाटला. त्यानंतर फलक उतरविल्यावर जमावाने जल्लोष करीत जोरदार घोषणाबाजी केली. 

फलक उतरविल्यानंतर जमाव तेथून निघून गेला. मात्र, मारुती चौकातील फलक फाडल्याचे समजल्यानंतर शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. त्यांनीही जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली. त्यावेळी आंदोलक शहरातून बंदचे आवाहन करीत फिरत होते. मारूती चौकात जमाव जमल्याचे समजल्यानंतर आंदोलकही शहर पोलिस ठाण्यापासून हरभट रस्त्याने मारूती चौकाकडे निघाले. 

दत्त-मारूती रस्त्यावरील एका थिएटरजवळ दोन्ही जमाव आमनेसामने आले. दरम्यान अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, निरीक्षक रविंद्र शेळके फौजफाट्यासह तेथे दाखल झाले. पोलिसांना पाहताच दोन्हीकडील जमावातील कार्यकर्ते पांगले. त्यानंतर शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पुन्हा मारूती चौकात जमले. तेथे त्यांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोस्टर फाडणार्‍यांवर कारवाई झाल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. 

मारूती चौकात दोन्ही जमाव समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाल्याचे समजताच पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी जमावात जाऊन त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलकांवर कारवाईसाठी जमाव आक्रमक बनला होता. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, आमदार सुधीर गाडगीळही मारूती चौकात आले. 

यावेळी अधीक्षक शर्मा, आमदार गाडगीळ यांनी जमावाचे म्हणणे ऐकून घेऊन शांत राहण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंच्या प्रमुखांसह महापौर, स्थानिक आमदार, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन अधीक्षक शर्मा यांनी यावेळी दिले. त्याशिवाय तोडफोड करणार्‍यांवर पुरावे गोळा करून गुन्हे दाखल करण्यात येतील असेही सांगितले. त्यानंतर जमाव शांत झाला.  आमदार गाडगीळ यांनीही शांतता पाळून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याशिवाय कार्यकर्त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

दुपारी तीननंतर शहरातील वातावरण निवळले, जमावही पांगला.  आंदोलक निघून गेले तरी उशिरापर्यंत मारूती चौकासह संवेदनशील परिसरात रात्रीपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, निरीक्षक राजू मोरे, राजन माने, प्रताप पोमण, रविंद्र डोंगरे, रमेश भिंगारदेवे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. 

तोडफोड करणार्‍यांविरुद्ध गुन्हे

सांगली : प्रतिनिधी

सांगलीत बुधवारी पुकारलेल्या बंदवेळी अज्ञातांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली. पंचवीसपेक्षा अधिक दुकानांसह चारचाकी गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांनी आज दिवसभर शहरात विविध ठिकाणचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. त्याच्या फुटेजवरून तोडफोड करणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सांगली बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळपासूनच कार्यकर्ते बंदचे आवाहन करीत शहरात फिरत होते. आंदोलकांची रॅली शहरातून सुरू असताना अज्ञातांनी गणपती पेठ, कापड पेठ, मिरज रस्ता, दत्त-मारुती रस्ता आदी परिसरातील दुकानांवर दगडफेक केली. यामध्ये पंचवीसहून अधिक दुकाने फोडण्यात आली. 

त्याशिवाय रॅली सुरू असताना अज्ञातांनी बापट बाल मंदिर, स्टेशन चौक, पुष्पराज चौक आदी ठिकाणी उभ्या असलेल्या  पंचवीसहून अधिक गाड्यांच्या काचा फोडल्या. त्याशिवाय बालाजी चौक, गारमेंट चौकातील फळविक्रेत्यांची फळेही विस्कटण्यात आली. एका दुकानातील साहित्य रस्त्यावर विस्कटून टाकण्यात आले. त्याशिवाय अनेक ठिकाणी अज्ञातांनी दगडफेक केल्याचेही निदर्शनास आले. 

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी विविध ठिकाणचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. बुधवारी सायंकाळी सहानंतर या चित्रीकरणातील फुटेजद्वारे तोडफोड करणार्‍यांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रविंद्र शेळके रात्री उशिरापर्यंत हुल्लडबाजांची नावे निष्पन्न करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम करीत होते. रात्री उशीरापर्यंत त्याबाबतची माहिती मिळू शकली नाही.