Wed, Jun 26, 2019 17:27होमपेज › Sangli › भीमा-कोरेगावप्रश्‍नी याचिका दाखल करणार 

भीमा-कोरेगावप्रश्‍नी याचिका दाखल करणार 

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 28 2018 12:07AMसांगली : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रशासनाला होती. तरीदेखील त्यांनी या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्रीही ठरतात. याप्रकरणात नि:पक्षपाती चौकशी न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, असा इशारा बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी दिला. बहुजन क्रांती मोर्चाची परिवर्तन यात्रा कळंबी व सांगली येथे आली. त्यानिमित्त सांगलीत झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मेश्राम पुढे म्हणाले, भीमा- कोरेगावच्या ऐतिहासिक लढ्याला दोनशे वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्ताने 31 डिसेंबरला या ठिकाणी केंद्र शासनाचे मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. तसेच अनेक समाजाचे नेतेही उपस्थित होते. त्यामुळे हा कार्यक्रम मोठा होणार याची कल्पना प्रशासनाला होती. दंगल सुरू झाल्यानंतर याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी पोलिस यंत्रणा पाठवली नाही. त्यामुळे दंगलीची माहिती त्यांना  असतानाही दुर्लक्ष केले. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. यासंदर्भात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

देशावर अजूनही मनुवाद्यांचेच राज्य

मेश्राम म्हणाले, सत्ता कोणत्याही पक्षाची येऊ, सत्ताधारी मात्र ब्राह्मण्यवादीच असतात. देशातील पाच प्रमुख पक्षाचे लोक हे मनुवादी आहेत. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बहुजनांची सत्ता आलेली नाही. त्यामुळे अजूनही बहुजन समाज हा गुलाम अवस्थेत आहे. या गोष्टी बहुजन समाजाने लक्षात घेतल्या पाहिजेत. हे समजून सांगण्यासाठी आम्ही संपूर्ण देशभरातून बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून परिवर्तन यात्रा काढत आहोत. 

सहा हजार जातींनी एकत्र यावे

मेश्राम म्हणाले, इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा, हे तत्व वापरून देशावर राज्य केले. त्याचप्रमाणे मनुवादी हे बहुजन समाजाला सहा हजार जातीमध्ये विभागणी करून त्यांच्यावर राज्य करीत आहेत. त्यांना  एकत्र करून न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे. संयोजक नामदेव करगणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुनील गुरव,  उमेश जवळ, शेवंता वाघमारे, प्रमोद इनामदार, राजेंद्र गायकवाड आदींनी मनोगत व्यक्‍त केले.