Wed, Jan 23, 2019 10:41होमपेज › Sangli › भारतरत्न अटलजींचा अस्थिकलश गुरुवारीं सांगलीत

भारतरत्न अटलजींचा अस्थिकलश गुरुवारीं सांगलीत

Published On: Aug 22 2018 10:41PM | Last Updated: Aug 22 2018 10:41PMसांगली/मिरज : प्रतिनिधी

भाजपचे ज्येष्ठ नेते, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न कै. अटलबिहारी बाजपेयीजी यांचा अस्थिकलश गुरुवारी दुपारी १ वाजता सांगलीत येणार आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी हरिपूर येथील कृष्णा-वारणा पवित्र संगमावर अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येणार असून यावेळी भाजपचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित राहणार आहेत. 

श्रद्धेय अटलजींच्या अस्थींचे महाराष्ट्रात केवळ आठ ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. सांगलीला या आठ ठिकाणांमध्ये स्थान मिळाले आहे. सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ श्रद्धेय अटलजींच्या अस्थींचा कलश आणण्यासाठी मुंबईस रवाना  झाले असून गुरुवारीदुपारी १ पर्यंत अस्थिकलश घेऊन सांगली येथे येतील. अटलजींवर प्रेम करणारे नागरिक, भाजपसह सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते  याना अस्थिकलशाचे दर्शन विश्रामबाग येथील गाडगीळ यांच्या कार्यालयात घेता येईल. 

शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत अस्थिकलश हरिपूर येथील कृष्णा-वारणा संगमावर विसर्जनासाठी नेण्यात येणार आहे. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक ठिकठिकाणी अस्थिकलशावर फुले वाहून श्रद्धांजली अर्पण करू शकतील. भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तसेच अटलजींवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी अटलजींच्या अस्थिकलश दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुधीरदादा गाडगीळ व भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्याचे  खासदार, आमदार, महानगरपालिकेचे महापौर उपमहापौर व नगरसेवक,  जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व  सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती व  सदस्य, तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.