Thu, Apr 25, 2019 23:27होमपेज › Sangli › जिल्ह्यात 177 कन्या ठरल्या ‘भाग्यश्री’

जिल्ह्यात 177 कन्या ठरल्या ‘भाग्यश्री’

Published On: Jun 01 2018 2:13AM | Last Updated: May 31 2018 11:05PMसांगली : प्रतिनिधी

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना प्रोत्साहन अनुदानासाठी जिल्ह्यातील सर्व 89 प्रस्ताव पात्र ठरले आहेत. पात्र 177 कन्यांच्या नावावर लवकरच प्रोत्साहन अनुदान जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी यांनी दिली. जिल्हा परिषदेत गुरूवारी महिला व बालकल्याण समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी होत्या. सदस्या संध्या पाटील,  वंदना गायकवाड, शोभा कांबळे, कलावती गौरगौड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. 

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत 1 व 2 मुलींवर कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या 89 दांपत्यांचे प्रस्ताव प्रोत्साहन अनुदानासाठी आले आहेत. दि. 1 ऑगस्ट 2017 नंतर एका मुलीवर शस्त्रक्रिया केली असल्यास मुलीच्या नावे 50 हजार रुपयांची बचत ठेव ठेवली जाते. दोन मुलींवर शस्त्रक्रिया केली असल्यास प्रत्येक मुलीच्या नावावर 25 हजार रुपये बचत ठेव ठेवली जाते. ही रक्कम संबंधित मुलींच्या नावावर लवकरच वर्ग केली जाईल, अशी माहिती प्राचार्य डॉ. नायकवडी यांनी दिली. अनुदानाची रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत खात्यावर वर्ग करायची आहे. शासनाने ही अट रद्द करावी. संबंधित लाभार्थींना सोयीच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यास सहमती द्यावी, अशा मागणीचा ठराव करण्यात आला आहे, अशी माहिती प्रा. डॉ. नायकवडी यांनी दिली. 

राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी युवती, महिलांना पुस्तक अनुदान

सभापती प्राचार्या डॉ. नायकवडी म्हणाल्या, राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणार्‍या युवती व महिलांना जिल्हा परिषद महिला व बालकल्याणतर्फे मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी लागणार्‍या पुस्तकांसाठी 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत पुस्तक अनुदान दिले जाणार आहे. सन 2018-19 पासून ही योजना सुरू करण्यात येत आहे.