Sat, Jul 20, 2019 10:36होमपेज › Sangli › कर्जमाफीच्या आशेवर राहिल्याने व्याजाचा भुर्दंड

कर्जमाफीच्या आशेवर राहिल्याने व्याजाचा भुर्दंड

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 27 2018 12:14AMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढेल. दि. 30 जून 2017 पर्यंतची थकबाकी कर्जमाफीस पात्र ठरेल, अशी आशा अनेक शेतकर्‍यांमध्ये होती. कर्जमाफीच्या योजनेची व्याप्ती वाढली, मात्र दि. 30 जून 2017 पर्यंतच्या थकबाकीचा विचार झाला नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेल्या 35 हजार शेतकर्‍यांना फटका बसला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या व्याजमाफीस ते मुकले. साडेबारा टक्के व्याज व दंड व्याजचा भुर्दंड बसला आणि खरीप 2018 च्या कर्जासही ते अपात्र ठरले आहेत. 

सन 2012-13 ते 2015-16 या कालावधीत राज्यात अपुरा पाऊस झाला. अनेक गावात पैसेवारी 50 पेक्षाही कमी होती. सन 2013-14 व 2014-15 मध्ये अवेळी पाऊस, गारपीटचा फटका बसला होता. त्यामुळे शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नव्हते. थकबाकीमुळे नव्याने कर्जासही अपात्र ठरले होते. या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली. संघर्ष यात्राही काढली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2017 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दि.5 एप्रिल 2017 रोजी कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. 

योजनेचा शासन निर्णय दि. 28 जून 2017 रोजी जारी झाला. दि. 30 जून 2016  रोजी थकबाकीदार शेतकर्‍यांना  योजनेचा लाभ काही निकषांसह लागू होईल असे स्पष्ट केले. मात्र कर्जमाफीची चर्चा शासन निर्णय जारी होण्यापूर्वी वर्षभर जोरात होती. सन 2017 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा झाल्याने दि. 30 जून 2017 पर्यंतचे थकित कर्ज माफ होईल या आशेवर अनेक शेतकरी होते. त्याचा परिणाम वसुलीवरही झाला होता. 

पीक कर्ज वसुलीची दि. 30 जूनही अंतिम तारीख असते. दरवर्षी या मुदतीत पीक कर्जाची वसुली 80 ते 81 टक्के असते. पण 30 जून 2017 ची वसुली 65 टक्क्यांपर्यंत खाली घसरली. नेहमीपेक्षा सुमारे 15 टक्के वसुली कमी झाली. थकबाकी वाढली. जिल्हा बँकेकडील 35 हजार शेतकरी थकबाकीदार झाले. ही थकित रक्कम सुमारे 125 कोटी रुपये आहे. दि. 30 जून 2016 पर्यंत थकीत कर्जालाच कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार होता. मात्र दि. जून 2017 पर्यंतच्याही थकबाकीस कर्जमाफी योजनेचा लाभ होईल, अशी आशा या शेतकर्‍यांना होती. मात्र आशेवर पाणी फिरल्याचे दिसत आहेे.  

दि. 30 जून 2017 च्या आत परतफेड झाली असती तर केंद्र व राज्य शासनाच्या 6 टक्के व्याज परताव्याची रक्कम संबंधित शेतकर्‍यांना मिळाली असती. पण कर्ज थकबाकीत गेल्याने 6 टक्के व्याज परताव्याचा प्रश्‍नच उरत नाही. उलट थकित कर्जाची व्याज आकारणी दि. 30 जून 2017 पासून 6 टक्क्यांऐवजी 10.50 टक्के होणार आहे. शिवाय 2 टक्के दंडव्याज आकारणी होते. महत्त्वाचे म्हणजे पीक कर्ज थकीत राहिल्याने सन 2018 च्या खरीप हंगामास कर्जासाठी अपात्र ठरले आहेत. 

Tags : sangli, sangli news, Being on the hopes of debt waiver, Interest demurrage,