Wed, May 22, 2019 10:15होमपेज › Sangli › माणुसकीचे ब्रँड होऊन जगा : देशमुख

माणुसकीचे ब्रँड होऊन जगा : देशमुख

Published On: Apr 18 2018 12:53AM | Last Updated: Apr 17 2018 11:23PMसांगली : प्रतिनिधी

आधुनिकतेच्या आणि बँ्रडेडच्या नावे भौतिक सुखाच्या मागे लागून आपण माणूसपण हरवत आहोत. दु:ख ओढवून घेत आहोत. त्यामुळे ब्रँडेड नव्हे तर माणुसकीचे ब्रँड होऊन जगा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले. येथील श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये बसव व्याख्यानमालेत ‘पसायदान’ या विषयावर ते बोलत होते. पसायदानाचा अर्थ विषद करीत त्यांनी सुखी जीवनाचे मर्मच उलगडले.

अध्यक्षस्थानी बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने, संचालक सुशील हडदरे, उद्योजक प्रदीप दडगे, महोत्सव समिती अध्यक्ष रवींद्र केंपवाडे, अशोक पाटील, दीपक खोकले प्रमुख  उपस्थित होते.देशमुख म्हणाले, समाजाने  निवृत्ती, ज्ञानेश्‍वर, सोपान, मुक्‍ताईच्या आई-वडिलांना त्रासाने जीवन संपवायला लावले. परंतु समाजाचा उद्धार करणारे पसायदन अवघ्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्‍वरांनी मांडले. संपूर्ण विश्‍वाच्या जीवनातील काळोख संपून जावा, असे मागणे त्यांनी मागितले. हे पसायदान म्हणजे जीवनाचा खरा अर्थ आहे. 

ते म्हणाले, प्रत्येक शतकात अशा संतांचे जीवन समाजोद्धारक ठरले आहे. समाजाने त्यांना त्रास दिला तरी त्यांनी कल्पवृक्ष, पारिजातकाप्रमाणे आपल्या विचारांनी समाजाला सुखी करण्याचा प्रयत्न केला. महात्मा बसवेश्‍वर अशा समाजोद्धारकापैकी एक आहेत. परंतु  दुर्दैवाने माणूस भौतिक सुखाच्या मागे लागून सुख विसरू लागला आहे. क्षणा-क्षणाला फसवाफसवी, घृणा, मत्सराने माणुसकीच विसरत चालला आहे.

देशमुख म्हणाले, स्वत:साठी मागतो ती भीक, कुटुंबासाठी मागतो ती भिक्षा आणि समाजासाठी मागतो ते दान. त्यामुळे अशा सद्भावनेनेच पसायदान जगायला हवे. जगण्या, वागण्यात पसायदान उतरायला हवे. स्वार्थ, संकुचितपणा संपायला हवा.  स्वत:ला जगणार्‍या जनावरांपेक्षा दुसर्‍यांचा विचार करून माणूस म्हणून जगा. तरच तुम्ही सुखी व्हाल. तुमचे जीवन असे असावे की तुम्ही त्या दिशेने जाल, त्या दिशेने पुढच्या पिढीसाठी सुखची उद्याने व्हायला हवीत. बोर्डिंगचे व्यवस्थापक सतीश मगदूम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुनील कोरे, रमेश दडगे, मंगल सिंहासने, नंदकुमार अंगडी आदी उपस्थित होते.

त्याच त्या कळकट फाईल...!

देशमुख यांनी प्रशासकीय कामकाजातील रुक्ष कारभारावरही मार्मिक मल्‍लिनाथी केली. ते म्हणाले, सकाळपासून सायंकाळपर्यंत त्याच त्या कळकट फाईल, रुक्ष जीवनात मीही गुरफटलेला असतो. परंतु यातून जेव्हा बाहेर येतो तेव्हा खर्‍या अर्थाने मला जीवनातील वेगळेपण जावणते.

Tags : Become ,Humanity Brand: Deshmukh ,sangli news