Thu, Jul 18, 2019 10:35होमपेज › Sangli › भाजप सभागृह नेतेपदी बावडेकर; मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादीचे गटनेते

भाजप सभागृह नेतेपदी बावडेकर; मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादीचे गटनेते

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 11:34PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेत सत्तांतरानंतर भाजपकडून पहिल्याच सभागृह तथा गटनेतेपदी युवराज बावडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापौर, उपहापौरपदासाठी अर्ज भरण्यासंदर्भात आयोजित नगरसेवकांच्या बैठकीत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी ही निवड जाहीर केली. राष्ट्रवादीकडूनही गटनेतेपदासाठी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचे नाव जाहीर करण्यात आले. सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी या निवडीची घोषणा केली.

भाजप महापालिकेत सर्वाधिक मोठा पक्ष असून, 42 सदस्य आहेत. काँग्रेसचे 20, तर राष्ट्रवादीचे 15, स्वाभिमानीचा एक सदस्य निवडून आले आहेत. त्यानुसार सभागृह, विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीकडून गटनेतेपदासाठी अनेकजण इच्छुक होते.  भाजपकडून कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णयानुसार तिसर्‍यांदा निवडून आलेले श्री. बावडेकर यांना गटनेतेपदाची संधी देण्यात आली. गुरुवारी बैठकीत गाडगीळ यांनी ही निवड जाहीर केली. 

राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बागवान यांची निवड जाहीर केली. गुरुवारी त्यांच्या निवडीचे पत्र बागवान यांनी नगरसचिव के. सी. हळिंगळे यांच्याकडे  सुपूर्त केले. ही निवड अडीच वर्षांसाठी असल्याचे कमलाकर पाटील यांनी जाहीर केले. यावेळी श्रीनिवास पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, नगरसेविका संगीता हारगे, पवित्रा केरीपाळे आदी उपस्थित होते.

काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदासाठी उत्तम साखळकर, संतोष पाटील, मंगेश चव्हाण, संजय मेंढे, वहिदा नायकवडी  इच्छुक आहेत. महापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने नेत्यांची बैठक झाली. बैठकीला शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, युवानेते विशाल पाटील उपस्थित होते.  प्रत्येक नेत्याने आपापल्या समर्थकांची नावे पुढे केली. त्यावरून चर्चा रंगली, पण एकमत काही झाले नाही. त्यामुळे हा निर्णय आता महापौर निवडीनंतर घेण्यात यावा असे ठरले.