Mon, Jun 24, 2019 16:44होमपेज › Sangli › मणेराजुरीत दोन गटांत हाणामारी

मणेराजुरीत दोन गटांत हाणामारी

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 19 2018 11:01PMतासगाव : शहर प्रतिनिधी

मणेराजुरी (ता. तासगाव) येथे शेतात मशागत केलेले पैसे मागण्याच्या कारणावरून व उधारीच्या पैशाच्या कारणावरून दोन गटांत गुरुवारी जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांतील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जण जखमी आहेत.

पहिल्या गटातील अजित जोतिराम बेडगे, अमर खाशाबा गायकवाड, तर दुसर्‍या गटातील संजय भूपाल चव्हाण, स्वप्निल ऊर्फ अजय संजय चव्हाण, राहुल संजय चव्हाण (सर्व रा. मणेराजुरी)  अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  वरील पाचही जण जखमी आहेत.

तासगाव पोलिसांत पहिल्या गटातील अजय चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गुरुवारी रात्री पावणेआठ वाजता जिल्हा परिषद शाळेसमोरील शेती सेवा केंद्रात अजयचे वडील संजय चव्हाण मशागतीच्या  कामाचे पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी अजित बेडगे याने त्यांना शिवीगाळ करून दमदाटी सुरू केली. वादावादी झाल्यानंतर त्याने काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.

याबाबत अजय व त्याचा भाऊ राहुल हे जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही अजित व अमर गायकवाड यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर अजयला छातीवर व हातावर काठीने मारहाण केली. तपास सहायक पोलिस फौजदार माने करीत आहेत.

अजित बेडगे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता जि. प. शाळेसमोरील शेती सेवा केंद्रात संजय चव्हाण याला उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केली. यावेळी अजित याचा मित्र अमर खाशाबा गायकवाड हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही काठीने मारहाण केली. तपास हवालदार तुपे करीत आहेत.