Thu, Apr 25, 2019 17:30होमपेज › Sangli › बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 16 2018 11:58PM

बुकमार्क करा
बोरगाव : वार्ताहर

दीनदलितांचा कैवारी आणि सर्वसामान्यांचा आधार अशी स्वतःची ओळख निर्माण करणारे बापू बिरू वाटेगावकर (वय 96) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 

बुधवारी दुपारी 12 वाजता बोरगाव येथे कृष्णाकाठी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, सुना, नातवंडे, एक बहीण असा परिवार आहे. बोरगाव (ता. वाळवा) येथे एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या बापू बिरू यांच्यावर लहानपणीच मजुरी करण्याची वेळ आली. त्यांना कुस्तीची आवड होती. त्यांच्या ऐन उमेदीच्या काळातच गावगुंड, सावकारांशी त्यांचा संघर्ष सुरू झाला. 

12 खुनाचे आरोप, 30 वर्षे फरार!

सन 1965-66 मध्ये त्यांनी गुंडगिरी, सावकारीविरुद्ध बंडच पुकारले. याचदरम्यान त्यांच्या हातून पहिला खून झाला. त्यानंतर खुनांची ही मालिका सुरूच राहिली. त्यांच्या नावावर अंदाजे 12 खुनांची नोंद आहे. त्यानंतर ते 25 ते 30 वर्षे फरारी होते. यादरम्यान ते सातारा, सांगली, कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात फिरत होते. मात्र, ते पोलिसांच्या हाताला लागले नाहीत. शासनाने फरारी बापू बिरू यांची माहिती देणार्‍यास मोठे इनाम जाहीर केले होते; पण त्यांनी 30 वर्षे पोलिसांना गुंगारा दिला होता. 

हुंडा पद्धतीला विरोध

यादरम्यान त्यांनी हुंडा पद्धतीला विरोध करत कित्येक लेकी-सुनांचे संसार उभा केले. सावकारांच्या कचाट्यात सापडलेल्यांना न्याय मिळवून दिला. अनेकांच्या जमिनी सोडवून दिल्या. यासाठी त्यांनी वेळप्रसंगी बंदूकही चालविली. 
पोलिसांच्या तावडीतून पळविले

सन 1992 मध्ये मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली. खूनप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. एकदा कळंबा कारागृहातून न्यायालयीन कामकाजासाठी सांगली येथे त्यांना आणले असता शिगावचा कुख्यात गुंड रवी पाटील व त्याच्या साथीदारांनी हातकणंगलेजवळ बापू बिरू यांना पोलिसांच्या तावडीतून बेडीसह पळवून नेले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली होती. 

गुन्हेगारी क्षेत्राचा त्याग

शिक्षा भोगून आल्यानंतर बापू बिरू यांनी गुन्हेगारी क्षेत्र सोडून दिले.  उर्वरित  आयुष्य भजन, कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्‍वरी वाचन यामध्ये व्यतीत केले. त्यांच्या जीवनावर चित्रपट निघाले. तमाशातून त्यांचा जीवनपट रसिकांच्या समोर आला.