Tue, Apr 23, 2019 13:58होमपेज › Sangli › असा होता बोरगावचा ढाण्या वाघ 

असा होता बोरगावचा ढाण्या वाघ 

Published On: Jan 16 2018 3:32PM | Last Updated: Jan 16 2018 3:32PM

बुकमार्क करा
सांगली : पुढारी ऑनलाईन

बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बापू बिरु वाटेगावकर यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्याने वाळवा तालुक्यासह जिल्हयावर शोककळा पसरली. काही दशकांपूर्वी कृष्णा खोऱ्यात गावगुंडांची वाढती दहशत, महिलांवरील अत्याचार याविरोधात स्वत: शस्त्र हाती घेतले. त्यांनी तब्बल १२ गुंडांचा खून केला. सतत ३० वर्षे पोलिसांना चकवा देत त्यांनी अन्याय, अत्याचार करणाऱ्या गुंडांना, खासगी सावकारी करुन लुबाडणाऱ्यांना अद्दल घडवली. 

वाचा: बोरगावचा 'ढाण्या वाघ' बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बोरगाव (ता. वाळवा) येथे एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या बापू बिरू यांच्यावर लहानपणीच मजुरी करण्याची वेळ आली. त्यांना कुस्तीची आवड होती. त्यांच्या ऐन उमेदीच्या काळातच गावगुंड, सावकारांशी त्यांचा संघर्ष सुरू झाला. गावातील रंगा शिंदे गरिबांना त्रास द्यायचा. त्याच्याबरोबर असलेली गुंडांची फौज राजरोस कोंबड्या, मेंढ्या उचलायची. त्याचे पैसे मागितले तर दमदाटी केली जायची. रंगा भर रस्त्यांत स्त्रियांची छेड काढायचा. त्याचा मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढतच होता. शेवटी रंगा शिंदेचा बंदोबस्त करण्यासाठी बापू स्वत: पुढे आले. ‘असला नराधम जिवंत ठिवून चालायचा न्हाय’ म्हणत त्यांनी रंगाला संपवला. रंगाच्या भावाने चिडून बापू बिरुंना संपवण्याचा विडा उचलला. बापू बिरुंनी रंगाच्या भावाबरोबरच मामालादेखील यमसदनी पाठवले.

 

12 खुनाचे आरोप, 30 वर्षे फरार!

सन 1965-66 मध्ये त्यांनी गुंडगिरी, सावकारीविरुद्ध बंडच पुकारले. याचदरम्यान त्यांच्या हातून पहिला खून झाला. त्यानंतर खुनांची ही मालिका सुरूच राहिली. त्यांच्या नावावर अंदाजे 12 खुनांची नोंद आहे. त्यानंतर ते 25 ते 30 वर्षे फरारी होते. यादरम्यान ते सातारा, सांगली, कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात फिरत होते. मात्र, ते पोलिसांच्या हाताला लागले नाहीत. शासनाने फरारी बापू बिरू यांची माहिती देणार्‍यास मोठे इनाम जाहीर केले होते; पण त्यांनी 30 वर्षे पोलिसांना गुंगारा दिला होता. 

हुंडा पद्धतीला विरोध

यादरम्यान त्यांनी हुंडा पद्धतीला विरोध करत कित्येक लेकी-सुनांचे संसार उभा केले. सावकारांच्या कचाट्यात सापडलेल्यांना न्याय मिळवून दिला. अनेकांच्या जमिनी सोडवून दिल्या. यासाठी त्यांनी वेळप्रसंगी बंदूकही चालविली. 

पोलिसांच्या तावडीतून पळविले

सन 1992 मध्ये मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली. खूनप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. एकदा कळंबा कारागृहातून न्यायालयीन कामकाजासाठी सांगली येथे त्यांना आणले असता शिगावचा कुख्यात गुंड रवी पाटील व त्याच्या साथीदारांनी हातकणंगलेजवळ बापू बिरू यांना पोलिसांच्या तावडीतून बेडीसह पळवून नेले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली होती. 

गुन्हेगारी क्षेत्राचा त्याग

शिक्षा भोगून आल्यानंतर बापू बिरू यांनी गुन्हेगारी क्षेत्र सोडून दिले.  उर्वरित  आयुष्य भजन, कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्‍वरी वाचन यामध्ये व्यतीत केले. त्यांच्या जीवनावर चित्रपट निघाले. तमाशातून त्यांचा जीवनपट रसिकांच्या समोर आला.