Fri, Jul 19, 2019 14:12होमपेज › Sangli › पीक कर्ज वाटपास बँकांकडून टाळाटाळ

पीक कर्ज वाटपास बँकांकडून टाळाटाळ

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 9:43PMसांगली : प्रतिनिधी

शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्याबाबत बँकांकडून टाळाटाळ सुरू असल्याचे मंगळवारी येथे झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले.  पीक कर्ज वितरणात चालढकल सहन केली जाणार नाही. शेतकर्‍यांना  पीक कर्ज उपलब्ध करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी दिला आहे. पीककर्ज   वितरणात उद्दिष्टापेक्षा कमी कामगिरी करणार्‍या बँकांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात पीक कर्ज वितरणामध्ये  अनेक बँकांची कामगिरी निराशाजनक असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँकेचे एल. एस. कट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, विविध बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले,  शेतकर्‍यांना पीक कर्जाची गरज आहे. त्यांची अडवणूक करू नका. पीक कर्ज वितरण यंत्रणा गतिमान करा. जिल्ह्यास पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 1100 कोटींचे 
आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत अनेक बँकांची कामगिरी असमाधानकारक आहे. या बँकांनी शेतकर्‍यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील राहून पीककर्जाचा पुरवठा करावा, अशा सूचना देण्यात आल्या.

बँकांनी केलेले कर्ज वाटप आणि उद्दिष्ट 

दि.30 जूनपर्यंत बँकांनी पीक कर्जवाटपात केलेली कामगिरी व उद्दिष्ट असे : आंध्रा बँक 1 कोटी (11 कोटी), विजया बँक 54 लाख (5 कोटी), इंडियन ओव्हरसीज बँक 9 लाख (2 कोटी), युनियन बँक 17 कोटी (54 कोटी), स्टेट बँक ऑफ इंडिया 19 कोटी (69 कोटी), सेंट्रल बँक ऑफ इंडिया 1 कोटी (17 कोटी), बँक ऑफ महाराष्ट्र 37 कोटी (70 कोटी), बँक ऑफ बडोदा 15 कोटी (24 कोटी), आयडीबीआय 2 कोटी (10 कोटी), रत्नाकर बँक 4 कोटी (59 कोटी), आयसीआयसीआय बँक 33 कोटी (128 कोटी).