Wed, Mar 20, 2019 12:45होमपेज › Sangli › वाळूउपसा बंदीने बांधकामे ठप्प

वाळूउपसा बंदीने बांधकामे ठप्प

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लिंगनूर : प्रवीण जगताप 

वाळू उपशावर हरित लवाद  व शासनाने बंदी आणली आहे. महसूल खात्याने चोरट्या  वाळूवरही सातत्याने अंकुश ठेवला आहे. यामुळे वाळू उपशाचे ठेके पूर्णपणे बंद  आहेत. परिणामी बांधकामे ठप्प होऊ लागली आहेत. त्यामुळे बांधकाम करणारे  घरमालक, कंत्राटदार व मजुरांचे अतोनात हाल सुरू आहेत.  

वाळू बंदीने अक्षरश: अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.  रखडलेल्या बांधकामांचा परिणाम अनुषंगिक  वस्तूंच्या बाजारपेठेवरही झाला आहे. विटा, रंगकाम, स्टीलची खरेदी मंदावली आहे. बांधकामास लागणार्‍या सर्वच साहित्यांच्या खरेदीची उलाढाल थांबली आहे. 

 दुसरीकडे बांधकामाच्या बहुतांश कामांत कृत्रिम वाळूचा वापर  सुरू  झाला आहे. शहरांतील पूल, फ्लायओव्हर्स,  काँक्रिट रस्ते, मोठमोठे बिल्डींग प्रोजेक्ट्स, रेडिमिक्स प्लँट,  प्रिस्ट्रेस्ड पाईप्स यांच्या निर्मितीत अनेक ठिकाणी कृत्रिम वाळूचा पर्यायी वापर सुरू झाला आहे. शिवाय या कृत्रिम वाळूच्या वापराने बांधकामाची गुणवत्ता कमी न होता ती वाढते असे जाणकारांचे म्हणणे आहे. कारण नैसर्गिक वाळू गोलाकार असते तर कृत्रिम वाळूचे कण  साधारण त्रिकोणाकृती असतात. कोनिकल अँगलमुळे या बांधकामात घट्टपणा येतो. तो चुरा अधिक मजबुतीने चिकटला जातो, असे विज्ञान सांगते.