Fri, Apr 19, 2019 07:59होमपेज › Sangli › बालाजीनगर चोरीचा २४ तासांत छडा

बालाजीनगर चोरीचा २४ तासांत छडा

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 17 2018 1:51AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील कुपवाड रस्त्यावरील बालाजीनगर येथे झालेल्या चोरीचा अवघ्या 24 तासांत छडा लावण्यात आला. याप्रकरणी तीन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोन्या, चांदीचे दागिने, घड्याळे, कॅमेरा, 12 हजारांची रोकड, एलईडी, दोन मोबाईल असा दीड लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला. गुंडाविरोधी पथकाने सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई केली. 

आकाश श्रीकांत खांडेकर (वय 19, रा. सांगलीवाडी), राजू माणिक डांगे (वय 23, रा. काळीवाट, हरिपूर रस्ता, सांगली), अक्षय धनंजय पोतदार (वय 19, रा. अहिल्यानगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरातील बालाजीनगर येथील एक बंद बंगला फोडण्यात आला होता. याप्रकरणी रविवारी अरविंद सिद्धाप्पा ढोले (वय 54) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

तिघाही संशयितांनी ढोले यांच्या बंगल्याच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. आतील तीन तिजोर्‍या फोडून त्यांनी 24 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, एक किलो वजनाचे चांदीचे दागिने, दोन महागडी घड्याळे, एक कॅमेरा, 12 हजारांची रोकड, एलईडी, दोन मोबाईल असा ऐवज लंपास केला होता. 

सोमवारी दुपारी गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक संतोष डोके सहकार्‍यांसोबत शंभर फुटी रस्ता परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एका आरटीओ क्रमांक नसलेल्या मोपेडवर तीन युवक थांबल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते मोपेडवरून भरधाव वेगाने निघून गेले. पथकाने त्यांचा पाठलाग करून तीनच्या सुमारास त्यांना वालचंद महाविद्यालयाजवळ पकडले. 

त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे  चौकशी केल्यावर त्यांनी बालाजीनगर येथील ढोले यांचा बंगला फोडून ऐवज लंपास केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघाही संशयितांना संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

सहाय्यक निरीक्षक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण मोरे, महेश आवळे, शंकर पाटील, योगेश खराडे, सागर लवटे, संकेत कानडे, संतोष गळवे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

तिघेही रेकॉर्डवरचे गुन्हेगार

यातील तिघेही संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर सांगली शहर, सांगली ग्रामीण, तासगाव, शहापूर (इचलकरंजी) येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

Tags : sangli, Balajinagar stolen, incidence police, solve case, 24 hours,