Wed, Feb 20, 2019 21:13होमपेज › Sangli › तडकडताई आली.. पळा रे.. २०० वर्षांची अनोखी परंपरा

तडकडताई आली.. २०० वर्षांची परंपरा (Video)

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 13 2018 7:44AMसांगली : प्रतिनिधी

अंगावर काळी साडी आणि चेहर्‍यावर काळा मुखवटा अशा अवतारात हातातल्या सुपाने मुलांच्या मागे धावणार्‍या ‘तडकडताई’ला बघताच मुलांनी एकच धूम ठोकली. ‘आली रे आली भुताची आई आली, तकडकताई आली, पळा रे पळा’ असा एकच गलका गावभाग  परिसरात गुरुवारी घुमत होता. 

आषाढी अमावस्येला सांगलीत जोगण्या उत्सवाला प्रारंभ झाला. तब्बल 200 वर्षांची परंपरा असणारी ही प्रथा कुंभार समाजाने जपली आहे.  पार्वती पांडुरंग कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील प्रमुखांनी गावभागातील श्री संगमेश्‍वर मंदिरात जाऊन देवीची पूजा केली. 

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तडकडताईचा फेरा निघाला. तडकडताईच्या रुपात   चैतन्य कुंभार   होता.  गावभागातून फेरीला सुरुवात झाली. सोबत जोगण्या बनलेले शशिकांत कुंभार, प्रकाश कुंभार, गजानन कुंभार यांनी हातामध्ये तलवारी घेऊन आणि ढोलाच्या तालावर नृत्य करीत फेरीला सुरुवात केली. 

सायंकाळी शाळा सुटल्यानंतर तडकडताईभोवती मुलांनी एकच गलका केला.  मुलांची गर्दी होऊ लागली, तशी तडकडताई हातामध्ये सूप घेऊन मुलांच्या दिशेने पळू लागली. समोर दिसेल त्या मुलाच्या पाठीत सुपाचा मार देऊ लागली. तडकडताईचा मार हा रोगराई घालवतो, अशी श्रद्धा आहे. कोणी तिला नमस्कार करून  आशीर्वाद घेत होते. कोणी मुलांना समोर उभे  करून आशीर्वाद देण्याची विनंती करीत होते. 

सिटी हायस्कूलमार्गे तडकडताईचा फेरा सिद्धार्थ परिसरात गेला.  वेताळ मंदिरात या फेरीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्या ठिकाणी जोगी आणि जोगण्याचे थाटात लग्न लावण्यात आले. साथीला वाजंत्री होतीच.