Fri, Jun 05, 2020 04:41होमपेज › Sangli › पोलिसच माझी बदनामी करीत आहेत : कामटे

पोलिसच माझी बदनामी करीत आहेत : कामटे

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 07 2017 1:31AM

बुकमार्क करा

सांगली : वार्ताहर

पोलिसच माझी बदनामी करीत आहेत, असा कांगावा करीत बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कामटेसह सहा संशयितांना दि. 19 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. आर. इंदलकर यांनी आज दिले. सर्व संशयितांना न्यायालयात आणल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलिस व्हॅनला गराडा घातला होता. 

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने आज त्यांना  न्यायालयात उभे करण्यात आले. यावेळी सहाय्यक सरकारी अभियोक्ता पी. पी. हजारे उपस्थित होते. 

मला न्यायालयात आणण्यापूर्वी पोलिस बातमी लिक करतात. त्यामुळे न्यायालयात आम्हाला बघण्यासाठी गर्दी वाढते, अशी तक्रार युवराज कामटे याने त्याला न्यायालयात घेऊन जाणार्‍या पोलिसांपाशी केली. त्याने या कारणावरून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत (कळंबा कारागृह) आहेत. त्यांना बुधवारी दुपारी 12 वाजता न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

संशयितांच्या नातेवाईकांची गर्दी...

कामटेसह या खून प्रकरणातील सर्व संशयितांना न्यायालय परिसरात आणल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी व्हॅनच्या भोवती गर्दी केली होती. यावेळी नातेवाईक त्यांना सफरचंद, केळी अशा फळांनी भरलेल्या पिशव्या देताना दिसून आले.   यावेळी कुटुंबियांना पाहून संशयितांना अश्रू अनावर झाले होते. संशयितांच्या कुटुंबियांशिवाय त्यांचे समर्थक तसेच काही राजकीय कार्यकर्तेही त्यांना भेटण्यासाठी न्यायालय परिसरात आले होते.