Sat, Jan 19, 2019 23:03होमपेज › Sangli › पाऊस आला धावून, रस्ते गेले वाहून

पाऊस आला धावून, रस्ते गेले वाहून

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 7:52PMकोकरूड : वार्ताहर

शिराळा तालुक्यात यावर्षी गेल्या आठ  दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. संततधार  पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची वाताहत झाली आहे. कोकरूड, बिळाशी, खुजगाव, हात्तेगाव व परिसरात मुख्य रस्त्यांची चाळण झाली आहे. पाऊस आला धावून रस्ते गेले वाहून, असे चित्र सर्वत्र दिसत आहे. प्रवाशांना व वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यांत खड्डे पडले असल्याने छोटे - मोठे अपघात होत आहेत. निकृष्ट कामांमुळे वाहनधारकांतून व लोकांतून संताप व्यक्त होत आहे. खराब कामांमुळे अनेकांना विविध  व्याधीला सामोरे जावे लागत आहे. शिराळा तालुक्यातील अनेक मार्गावर दरवर्षी खड्ड्यांमुळे अवस्था बिकट होत असते.

याच रस्त्याच्या दुरूस्तीचा दरवर्षी घाट घातला जातो. डांबरीकरणावेळी निकृष्ट दर्जाचे काम करून लाखोंचा ढपला केला जात असल्याचा आता आरोप होऊ लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर बिळाशी, हात्तेगाव, शिराळा, आरळा, कुसाईवाडी, खुजगाव, पाचगणी व परिसरात रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, अशी अवस्था झाली आहे. अनेक मार्गावर मे  अखेरीस डांबरीकरण करण्यात आले होते. त्यातील काही रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन महिन्यापूर्वी केलेले रस्ते खराब होत असतील तर येणारा निधी मुरतो कुठे, असा सवाल आता जनतेतून विचारला जावू लागला आहे.