Thu, Feb 21, 2019 05:23होमपेज › Sangli › प्रथमच स्वबळावर कमळ फुलले 

प्रथमच स्वबळावर कमळ फुलले 

Published On: Aug 04 2018 1:36AM | Last Updated: Aug 03 2018 10:31PMसांगली : प्रतिनिधी

या महापालिका निवडणुकीत भाजपने 41 जागा पटकावत सत्ता काबीज केली आहे. अनेक वर्षांची काँग्रेसची सत्ता त्यामुळे संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत भाजपने प्रथमच कमळ या चिन्हावर स्वबळावर निवडणूक लढवली. एका जागेचा अपवाद वगळता सर्व म्हणजे 77 जागा लढवल्या आणि विजय मिळवला. त्यामुळे  महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातही भाजपचे  राजकीय आव्हान पुन्हा एकदा निर्माण झाले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली होती. त्यामुळे भाजपने एकाच वेळी दोन्ही पक्षांना दणका दिला आहे. त्यामुळे भाजपविरोधात आघाडीचे राजकारण यशस्वी होईल, या विरोधकांच्या संकल्पनेलाही मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी शिवसेनेचा या निवडणुकीत दारूण पराभव झाल्यामुळे  त्या पक्षाच्या  महापालिका क्षेत्रातील प्रभावालाच फार मोठा धक्का बसला आहे.गावभाग हा गेली सुमारे पंचवीस ते तीस  वर्षे माजी आमदार संभाजी पवार यांचा बालेकिल्ला मानला जात होता.  या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज आणि गौतम पवार यांनी स्वाभिमानी आघाडीतर्फे त्या प्रभागात पॅनेल उभे केले होते. सगळी शक्ती पणाला लावली होती, मात्र त्या पॅनेलचाही मोठा पराभव झाला.

खूप पूर्वी जनसंघातर्फे नगरपालिकेची निवडणूक लढवण्यात येत असे. त्यावेळी त्या पक्षाला उमेदवार शोधून उभे करावे लागत. अनामत रक्कम वाचली तरी खूप झाले, अशी स्थिती होती. नंतर भाजपची स्थापना झाली. मात्र राजकीय शक्ती अल्पच होती.  तत्कालीन नगरपालिकेत किंवा नंतर महापालिकेत भाजपचे बळ अगदी अल्प असायचे. एकाद-दुसरा नगरसेवक निवडून यायचा.  पूर्वी नागरिक संघटनेचा सन 1975मध्ये पहिला प्रयोग झाला. त्यावेळी त्या संघटनेतर्फे जनसंघाचे काही सदस्य तत्कालीन नगरपालिकेत प्रतिनिधीत्व करीत होते. नंतरही नागरिक संघटनेतर्फे दोन-तीन नगरसेवक नगरपालिकेत निवडून जात. सन 2008 मध्ये महाआघाडी आणि नंतर स्वाभिमानी आघाडी अशा प्रयोगात निवडून आलेल्यांमध्ये भाजपचे दोन-चार नगरसेवक असायचे.  

या निवडणुकीत मात्र भाजपने स्वबळावर लढतीची पूर्ण तयारी केली होती. शिवसेना बरोबर येणार नाही, हे त्या पक्षाच्या नेत्यांनी गृहितच धरले होते. माजी आमदार पवार यांच्या स्वाभिमानी आघाडीशीही थोडीफार चर्चा झाली होती. पण ती यशस्वी झाली नाही.  कारण निवडणूक कमळ या चिन्हावरच लढवायची.  आघाडीत सहभागी होऊन अन्य कोणत्याही चिन्हावर लढायचे नाही, असा भाजप नेत्यांचा निर्धारच होता. त्यानुसार त्यांनी संपूर्ण नियोजन केले होते. त्यामध्ये ते यशस्वी झाले.