Mon, Jun 24, 2019 16:40होमपेज › Sangli › भाजप विजयाचे ठरले चार इनकमिंग शिलेदार

भाजप विजयाचे ठरले चार इनकमिंग शिलेदार

Published On: Aug 06 2018 1:55AM | Last Updated: Aug 05 2018 9:07PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला चितपट करीत भाजपने एकहाती सत्ता मिळविली. मात्र या विजयाचे माजी नगरसेवक सुरेश आवटी, पैलवान दिलीप सूर्यवंशी, युवानेते सुयोग सुतार आणि नगरसेवक महेंद्र सावंत हे इनकमिंग शिलेदार ठरले.  ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी  पॅनेलच्या प्रचारापासून ते विजयश्री खेचून आणण्यापर्यंत धुरा सांभाळली. त्यांच्याच पाठबळ आणि सहकार्याने निम्म्याहून अधिक म्हणजे तब्बल 18 उमेदवार निवडून आले. 

भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीतून येणार्‍यांसाठी ‘इनकमिंग फॉर्म्युला’ राबवला होता.  अनेक आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांना प्रवेशही दिले होते.  मिरजेत नगरसेवक सुरेश आवटी यांच्यासह आजी-माजी 12 जणांना प्रवेश दिला.

आवटी यांनी मिरजेत प्रभाग 3 मध्ये त्यांचे पुत्र संदीप आवटी, शिवाजी दुर्वे, अनिता व्हनखंडे व शांता जाधव यांच्या पॅनेलला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. प्रभाग 4 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने  अपक्ष पॅनेलला पाठबळ दिले होत.तेथे अनिलभाऊ कुलकर्णी आणि पॅनलच्या विरोधात आवटी यांचे पुत्र निरंजन, पांडुरंग कोरे, अस्मिता सरगर, डॉ. मोहना ठाणेदार यांनी लढत दिली. त्यांचे पॅनेलही आवटींच्या ताकदीवर निवडून आले. 

प्रभाग 7  मध्येही काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार, स्थायी सभापती बसवेश्वर सातपुते, नगरसेविका धोंडुबाई कलगुटगी यांच्यासारखे दिग्गजांचे काँग्रेस पॅनेल भाजपसमोर होते. तेथे भाजपतर्फे आवटींचे समर्थक गणेश माळी, माजी नगरसेवक आनंदा देवमाने, संगीता खोत व गायत्री कुल्लोळी यांचे पॅनेल होते. या पॅनेललाही आवटींची मोठी मदत लाभली.  मिरजेत भाजपचे तब्बल 8 नगरसेवक निवडून आणण्यात आवटींचा मोठा वाटा आहे.

दिलीप सूर्यवंशी  ऐनवेळी भाजपसोबत आले.  प्रभाग 12 मध्ये त्यांचे पुतणे धीरज सूर्यवंशी, संजय यमगर, नसीम शेख, लक्ष्मी सरगर यांचे पॅनेल एकतर्फी निवडून आणले. प्रभाग 17 मध्ये  भाजपकडून  सुयोग सुतार यांनी लढतीची तयारी केली होती. मात्र  त्यांना स्वत:ऐवजी पत्नी सौ. गीता यांची उमेदवारी स्वीकारावी लागली. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई पॅनेलमध्ये होते. तिथे तिघेजण निवडून आले. यामध्ये सुयोग सुतार यांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली.

शेवटच्या क्षणी नगरसेवक महेंद्र सावंत व त्यांच्या भावजय स्नेहल सावंत यांनी थेट उमेदवारी घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनीही दोघांबरोबरच नसिमा नाईक यांनाही विजयाची संधी मिळवून दिली.