होमपेज › Sangli › बंडखोरांना रसद पुरवून मनपात भाजपचा विजय 

बंडखोरांना रसद पुरवून मनपात भाजपचा विजय 

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 11:23PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत भाजपने काय दिवे लावले?  स्व:बळाची भाषा करणार्‍या भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बंडखोरांना धमकावून,  रसद पुरवून मागच्या दाराने निवडणूक जिंकली, असा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी पत्रकार बैठकीत केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी महापौर, उपमहापौर निवडणूक ताकदीने लढणार, असा दावा त्यांनी केला.

सांगलीत काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार करून मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीला शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, पक्ष निरीक्षक प्रकाश सातपुते, युवानेते विशाल पाटील आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, भाजप महापालिका जिंकल्याचा डांगोरा पिटत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकजण काँग्रेसमुक्‍त जिल्ह्याची भाषा करीत आहेत.  पद्मभूषण वसंतदादा, कै. डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील यांच्या काँग्रेसच्या विचाराचा वारसा जिल्ह्याला आहे. जनता जिल्हा काँग्रेसमुक्‍त कधीच होऊ देणार नाही. शिवाय महापालिका जिंकण्यात त्यांचे कर्तृत्व काय? काँग्रेस-राष्ट्रवादीचे 35 नगरसेवक निवडून आले आहेत. दहा जागांवर आघाडीचे उमेदवार 200 पेक्षा कमी मताने पराभूत झाले आहेत.

भाजप स्व:बळाची भाषा करीत रडीचा डाव खेळला. शेवटच्या चार दिवसांत साम-दाम वापरत आघाडीच्या बंडखोरांना मोठी रसद पुरविली. चिन्ह पोहोचणे शक्य नव्हते. त्यांच्याकडे मोठी रसद आली कोठून? एवढेच नव्हे तर अपक्षांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पॉकेटमधील मते मिळविण्यासाठी भाजपने धमकावले. अशा अथक प्रयत्नांनी त्यांचे 41 नगरसेवक निवडून आले आहेत. 

डॉ. कदम म्हणाले, आम्ही पराभव नम्रपणे मान्य करतो. मैत्रीपूर्ण लढतीनेही दोघांने नुकसान झाले. पण पुन्हा ताकदीने कामाला लागू. आमचे नगरसेवक महापालिकेत सांगलीकरांचा आवाज उठवत विकासासाठी न्याय देतील. जिल्ह्यात एकमेव काँगे्रसचा विधानसभेतील आमदार मी आहे याची मला जाणीव आहे. मला आमदार होऊन दोन महिने झाले होते. त्याच कालावधीत मनपा निवडणूक झाली आहे. यापुढे मी पूर्ण पाठबळ देणार आहे. 

मराठा आरक्षण जाहीर न झाल्यास उद्रेक होईल

डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकारने फसविले आहे. चालढकल करीत वेळ मारून नेत आहे. आत्महत्यांचे सत्र वाढले असून, वेळेत निर्णय न झाल्यास मोठा उद्रेक होईल. सरकारला ते जड जाईल. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी तत्काळ आरक्षणाचा अध्यादेश काढणे हा सुचविलेला पर्याय सर्वोत्तम आहे. धनगर, मुस्लिमांनाही तत्काळ आरक्षण द्यावे.