Wed, Apr 24, 2019 21:30होमपेज › Sangli › भाजपचा विजय नियोजनबद्ध प्रचारामुळे

भाजपचा विजय नियोजनबद्ध प्रचारामुळे

Published On: Aug 04 2018 1:36AM | Last Updated: Aug 03 2018 10:28PMसांगली : प्रतिनिधी 

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पराभूत करणे सोपे नव्हते. मात्र नियोजनबद्ध प्रचारामुळे भाजपला ते शक्य झाले.महाआघाडीच्या प्रयोगाचा अपवाद वगळता गेली वीस वर्षे महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती. त्याआधी  जवळजवळ चाळीस वर्षे तत्कालीन नगरपालिकेत काँग्रेसचीच सत्ता होती.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने काळाची पावले ओळखून आघाडी केली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे मुरब्बी आणि मुत्सद्दी नेते. त्यांच्या देखरेखीखाली आघाडीने प्रचाराची सगळी रणनिती आखली होती. त्यामुळे भाजपने आघाडीला शह देण्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर दिला होता.त्याचा रिझल्ट त्यांना मिळाला.

महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची टीम काम करीत होती. शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, सांगली जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील , इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, माजी उपमहापौर शेखर इनामदार, रवि अनासपुरे, रघुनाथ कुलकर्णी यांनी प्रामुख्याने प्रचाराची रणनिती आखली. 

निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ना. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात  भाजप नेत्यांच्या सतत बैठका सुरू होत्या. त्यामध्ये प्रचार कसा करायचा याचे नियोजन ठरले होते. प्रचारात फारसा गाजावाजा करायचा नाही. ‘वन बूथ-थर्टी यूथ’ या तत्वानुसार प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांची फिल्डिंग लावायची. त्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले होते. तसेच जवळच्या जिल्ह्यातूनही भाजपचे कार्यकर्ते येथे आले होते.  

निवडणूक जवळ  आल्यावर प्रचार टीममध्ये सहभागी असलेल्या सर्व नेत्यांच्या रोज रात्री बैठका होत असत. त्या बैठकीत प्रत्येक प्रभागातील प्रचार कार्याचा आढावा घेतला जात असे. कार्यकर्ते कुठे कमी पडतात, असे वाटले तर तिथे दुसर्‍या दिवशी कार्यकर्त्यांची कुमक पाठवली जात असे. आमदार गाडगीळ आणि आमदार खाडे या दोघांनी  गेले काही महिने अनुक्रमे सांगली व मिरज मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती.  दोघांनीही ठिकठिकाणी पदयात्रा काढल्या. कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्याही बैठका घेतल्या.  प्रामुख्याने यावेळी नागरिकांनी  नागरी सुविधांच्या समस्या मांडल्या. त्या सोडवण्याची मागणी केली. या दोन्हीही आमदारांनी रस्ते, गटारी, कचरा उठावा, दवाखाने अशा विषयांवर नागरिकांशी संवाद साधला. त्यांना चांगल्या सुविधा देऊ असे आश्वासन दिले. दोघांच्याही आश्वासक कार्याचा या निवडणुकीच्या निकालावर फार मोठा परिणाम झाला असे मानले जाते. 

आघाडीच्या प्रचारात स्थानिक प्रश्नांना फाटा

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आघाडी केल्यामुळे तसे निर्धास्त होते. आता भाजपला रोखणे किंवा सत्तेपासून दूर ठेवणे कठीण नाही, असे त्यांना वाटत होते. त्याचवेळी त्यांनी जाहीर प्रचारावर अधिक भर दिला. निवडणुकीचा नांदेड पॅटर्न सांगलीत राबवू असे सांगितले. केंद्र आणि राज्याचा कारभार, नोटाबंदी, जीएसटी, इंधन दरवाढ अशा विषयांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सरकारला धारेवर धरले.त्याचवेळी भाजपने नागरी सुविधांच्या प्रश्नांवर प्रचाराचा भर ठेवला होता.