Wed, Apr 24, 2019 12:18होमपेज › Sangli › ‘पलूस-कडेगाव’बाबत भाजपचा आज फैसला

‘पलूस-कडेगाव’बाबत भाजपचा आज फैसला

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 11:55PMसांगली : प्रतिनिधी

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजपतर्फे लढवायची का आणि उमेदवार कोण असेल, याबाबत  बुधवारी निर्णय होणार आहे. दरम्यान,  निवडणुकीच्या तयारीबाबत पक्षश्रेष्ठींनी सूचना दिल्याचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले. आमची सर्व तयारी आहे.  उद्या दुपारपर्यंत त्यासंदर्भात  आदेश मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे ही  पोटनिवडणूक होत आहे. काँगे्रसकडून डॉ. कदम यांचे पुत्र डॉ. विश्‍वजित कदम यांनी सोमवारी शक्‍तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी   निवडणूक बिनविरोध करावी, असे जाहीर आवाहनही केले होते. 

दरम्यान, ज्येष्ठ नेते (स्व.) संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक काँग्रेसने कुठे बिनविरोध केली होती, असा सवाल करीत पृथ्वीराज देशमुख यांनी निवडणूक लढणार असल्याचे संकेत यापूर्वी दिले होते. अर्थात, याबाबत भाजप पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही सांगण्यात आले होते. गेल्या आठवड्यात मिरजेत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही कार्यकर्त्यांनी  पोटनिवडणूक लढवावी,  असा पवित्रा घेतला होता.

जिल्हाध्यक्ष देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी तसा प्रस्ताव प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविला होता. त्याबाबतचा निर्णय उद्या अपेक्षित आहे. देशमुख म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी मला तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत;  परंतु याबाबतचा अंतिम निर्णय बुधवारी दुपारी दोन-अडीचपर्यंत होईल.