Tue, May 21, 2019 04:06होमपेज › Sangli › भाजपची ताकद वाढली; मिरज पॅटर्नला धक्का

भाजपची ताकद वाढली; मिरज पॅटर्नला धक्का

Published On: Aug 04 2018 1:36AM | Last Updated: Aug 03 2018 11:27PMमिरज : जालिंदर हुलवान  

विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या निवडणुकांत मिरज तालुक्यांत भाजपने विजय मिळवले होेते. आता या निवडणुकीतील विजयामुऴे  भाजपची महानगरपालिकेमध्येही ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीमध्ये जनतेने मिरज पॅटर्नला धक्का दिला आहे.  त्या पॅटर्नच्या नेत्यांना महापालिकेतून आऊट केले, मात्र त्यांच्या पुत्रांना महापालिकेमध्ये इन केले आहे.        

1998 मध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची एकत्रित महानगरपालिका झाली. तिथे  भाजपचे स्थान नगण्यच होते. एखादा दुसरा नगरसेवक महानगर पालिकेमध्ये मिरजेतून  निवडून जायचा. मात्र या निवडणुकीमध्ये हे चित्र बदलले आहे. मागच्या निवडणुकीमध्ये  भाजपचा मिरजेतून एकच नगरसेवक निवडून गेला होता. आता मात्र  ती संख्या बारा झाली आहे.महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे होते. ही निवडणूक जिंकायची असा भाजपने यापूर्वीच चंग बांधला होता. त्यादृष्टीने मिरजेत आमदार सुरेश खाडे यांनी ताकद लावली. काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक आजी- माजी नगरसेवक भाजपच्या गोटात घेतले. 

यापूर्वी आमदार  खाडे यांनी शहरामध्ये फारसे लक्ष घातले नव्हते. त्यांचा राबता हा नेहमी ग्रामीण भागात असायचा. या निवडणुकीत मात्र त्यांनी  पूर्ण लक्ष घातले. मिरजेत प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच, सहा, सात व वीस असे सहा प्रभाग आहेत. या सहा प्रभागांमधून एकूण तेवीस उमेदवार निवडून द्यायचे होते. त्यापैकी बारा भाजपचे, आठ राष्ट्रवादीचे तर तीन काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले. या निवडणुकीने भाजपला मोठी ताकद व काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेससाठी भविष्यातील राजकारणासाठीही  पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. 

ही निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीचीही नांदी ठरणार आहे.  इद्रिस नायकवडी,  किशोर जामदार आणि विवेक कांबळे या तीन माजी महापौरांना पराभव पत्करावा लागला आहे. याचा विचार त्यांना निश्चितच करावा लागणार आहे.  मात्र त्यांचे  पुत्र निवडून आले आहेत.यंदा  अकरा नव्या चेहर्‍यांना जनतेने संधी दिली आहे. यामध्ये अनिता वनखंडे, संदीप आवटी, अस्मिता सलगर, मोहन ठाणेदार, करण जामदार, नरगिस सय्यद, रजिया काझी, गणेश माळी, योगेंद्र थोरात, स्वाती पारधी यांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनिता वनखंडे या भाजपच्या उमेदवार निवडून आल्या आहेत. येथे शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा चौपट मते त्यांना मिळाली आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक अजित दरेकर यांचा केवळ 131 मतांनी भाजपच्या शिवाजी दुर्वे यांनी पराभव केला. दिगंबर जाधव यांच्या आई शांता जाधव यांनी राष्ट्रवादीच्या यास्मिन चौधरी यांचा 294 मताधिक्क्यांनी पराभव केला आहे. सचिन जाधव हे एकेकाळचे सुरेश आवटी यांचे निकटवर्ती होते. मात्र सचिन जाधव व संदीप आवटी यांच्यात लढत झाली. यामध्ये संदीप  विजयी झाले. या प्रभागामध्ये सर्वांचे लक्ष  होते.  

प्रभाग क्रमांक चारमध्येही भाजपचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. येथे पांडुरंग कोरे, निरंजन आवटी या दोघांना पुन्हा संधी मिळाली आहे. प्रभाग पाचमध्ये तीन काँग्रेसचे व एक राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे. या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष होते. येथे मतदारांनी संजय मेंढे,  बबिता मेंढे,  मालन हुलवान यांना पुन्हा संधी दिली आहे. या प्रभागात जोरदार लढत झाली ती इद्रिस नायकवडी व  करण जामदार यांच्यामध्ये. करण जामदार यांनी प्रथमच निवडणूक लढवली आणि मुरब्बी अशा नायकवडी यांचा पराभव केला.

प्रभाग सहामध्ये  राष्ट्रवादीचे चारही उमेदवार निवडून आले. या प्रभागात मैनुद्दीन बागवान, अतहर नायकवडी या दोघांना पुन्हा संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या रजिया काझी यांना सात हजार चारशे चौसष्ट इतके विक्रमी मताधिक्क्य मिळाले आहे.  येथेच दुसर्‍या गटात अल्लाउद्दीन काझी या काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला मात्र पराभव पत्करावा लागला आहे.प्रभाग क्रमांक सातमध्ये चुरशीने लढत झाली. या प्रभागात भाजपच्या चारही उमेदवारांना संधी मिळाली आहे. येथे  स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते यांचा भाजपच्या आनंदा देवमाने यांनी पराभव केला.  या प्रभागात दुसर्‍या गटात नगरसेविका धोंडूबाई कलगुटगी यांचा पराभव  नगरसेविका संगीता खोत यांनी केला. गायत्री कल्लोळी या येथे क गटातून  निवडून आल्या. 

किशोर जामदार व भाजपचे गणेश माळी यांची  मात्र लढत चांगलीच रंगली. एकेकाळी  माळी हे  जामदार यांचे समर्थक मानले जायचे.  मात्र आज  माळी यांनी जामदार यांचा  पराभव केला. हा पराभव जामदार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रभाग क्रमांक वीसमध्ये  विवेक कांबळे व राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांची लढत गाजली. या अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत  कांबळे यांना केवळ सात मतांनी पराभव पत्करावा लागला. या प्रभागातील ब गटात स्वाती पारधी या नवख्या उमेदवार निवडून आल्या आहेत. 

या प्रभागातील क गटात भाजपच्या जयश्री कुरणे व राष्ट्रवादीच्या संगीता हारगे यांच्यात लढत झाली. गेल्यावेळच्या निवडणुकीतही हारगे विरुद्ध कुरणे अशीच लढत झाली होती. त्यावेळी हारगे या निवडून आल्या होत्या. याही निवडणुकीत हारगेच निवडून आल्या.

फक्त तीन पक्षांचे नगरसेवक

भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तीन पक्ष वगळता अन्य कोणत्याच पक्षाला आपला उमेदवार निवडून आणता आला नाही. शिवसेना, जनता दल, एमआयएम, बहुजन समाज पार्टी, भारिप बहुजन महासंघ, जिल्हा सुधार समिती व अपक्ष यांना आपले खातेही खोलता आले नाही.

आमदार खाडेंना आता तरी बक्षीस मिळणार का ? 

आमदार सुरेश खाडे हे भाजपचे आमदार म्हणून गेली 14 वर्षे काम करीत आहेत. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळेल असे वाटत होते. मात्र आतापर्यंत मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडलेली नाही. आता महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तसेच मिरजेतही पक्षाचे डझनभर नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आ. खाडे यांना मंत्रिपद मिळणार का याची चर्चा सुरू झाली आहे.