Sun, Jul 21, 2019 10:49होमपेज › Sangli › भाजपच्या नादाला लागल्यास सरपंचांना ‘अच्छे दिन’

भाजपच्या नादाला लागल्यास सरपंचांना ‘अच्छे दिन’

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 12:11AMसांगली : प्रतिनिधी

भाजप सरकारने सरपंचांची खुर्ची आणि अधिकार मजबूत केले आहेत. गावांना थेट निधी दिला जात आहे. ग्रामपंचायती व सरपंच यांना अधिक सक्षम करण्यासाठी भाजपचे सरकार सकारात्मक आहे. सरपंचांनी भाजपच्या नादाला लागावे; तुम्हाला निश्‍चितपणे ‘अच्छे दिन’ येतील, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राामसिंह देशमुख यांनी केले. 

अखिल भारतीय सरपंच परिषदेचा जिल्हा मेळावा मंगळवारी सांगली जिल्हा परिषदेत वसंतदादा पाटील सभागृहात झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देशमुख होते. सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, मानसिंग बँकेचे अध्यक्ष जे. के. (बापू) जाधव, प्रभाकर जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहूल गावडे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कोडग, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य खंडेराव जगताप, सुधीर जाधव, सचिन जगताप (पुणे), डॉ. पी. के. पाटील प्रमुख उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, भाजपच्या सरकारने ग्रामपंचायत आणि सरपंच यांच्याबाबतीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय धाडसी आणि महत्वपूर्ण आहे. दर सहा महिने आणि वर्षाला सरपंच बदल करण्यातून ग्रामपंचायतीचा कारभार प्रभावी कसा होणार? पण आता सरपंच यांची खुर्ची पाच वर्षे हलणार नाही. त्यामुळे स्थैर्य येईल. पंचायतींचा कारभार प्रभावी व गतीमान होईल. चौदाव्या वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी ग्रामपंचायतींना जात आहे. पूर्वी लाख-दोन लाख रुपये जमा होणार्‍या घरपट्टीवर कारभार चालवावा लागायचा, पण आता माणसी 2 हजार रुपये थेट गावाला मिळत आहेत. ग्रामपंचायतींना अधिक निधी, सरपंच, सदस्यांना मानधन यासह अन्य मागण्याही शासन निश्‍चितपणे सोडवेल. मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू. 

.. मग आमदार पोस्टग्रॅज्युएट हवा

सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, लोकशाहीच्या प्रयोगशाळेतील सारे प्रयोग सरपंच व ग्रामपंचायतीवर केले जातात. सरपंचांना दहावी पास नियम करायचा असेल तर मग पंचायत समिती सदस्य बारावी पास, जिल्हा परिषद सदस्य पदवीधर, आमदार पोस्ट ग्रॅज्युएट आणि खासदार पीएचडीधारक का नको? सध्या शासनाच्या निधीचा ओघ शहरांकडे वाढत आहे. गावांना पुरेसा निधी मिळत नाही. येणारे वर्ष हे निवडणुकीचे असून सरपंच व ग्रामपंचायतींच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी संघटीत लढा उभारला जाईल. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा राज्यव्यापी मेळावा होईल. 

जिल्हा परिषदेत सूर्य पश्‍चिमेला उगवला..!

संग्रामसिंह देशमुख म्हणाले, वसंतदादांच्या जिल्ह्यात, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा आहे. जिल्हा पिरिषदेत सूर्य पश्‍चिमेला उगवला आहे. केंद्र, राज्यातील भाजप सरकारच्या चांगल्या कामामुळे हे शक्य झाले आहे. जिल्हा परिषदेत पक्षविरहित काम सुरू आहे. 

प्रचंड तक्रारी येत आहेत; कारभार पारदर्शी करा

संग्रामसिंह देशमुख म्हणाले, ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत जिल्हा परिषदेकडे प्रचंड तक्रारी येत आहेत.पारदर्शी व स्वच्छ कारभार करा. राजकारण बाजुला ठेवून विकास करा. स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार, वॉटर कप स्पर्धेत चांगल्या कामाबद्दल सरपंच व गावे कौतुकास पात्र आहेत.