Mon, Apr 22, 2019 21:38होमपेज › Sangli › जल्लोषी मिरवणुकीने भाजप महापालिकेत

जल्लोषी मिरवणुकीने भाजप महापालिकेत

Published On: Aug 28 2018 1:44AM | Last Updated: Aug 27 2018 8:16PMसांगली : प्रतिनिधी

ढोल-ताशांचा निनाद, डॉल्बीचा दणदणाट... भगवे फेटे आदींसह संपूर्ण भगवेमय वातावरणात भाजपने सोमवारी (दि. 27) महापालिकेत सत्तांतराची भव्य जल्लोषी मिरवणूक काढली. स्टेशन चौक ते महापालिका अशा दणकेबाज मिरवणुकीने फटाक्यांची आतषबाजी करीत भाजपच्या पहिल्या महापौर सौ. संगीता खोत,  उपमहापौर धीरज सूर्यवंशी व भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी जल्लोषी वातावरणात पदभार स्वीकारला. 

अन्न-नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, भाजप नेते शेखर इनामदार, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, जिल्हापरिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे-म्हैसाळकर, पैलवान दिलीप सूर्यवंशी, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सुरेश आवटी, विठ्ठल खोत, श्रीकांत शिंदे, माजी नगरसेविका स्वरदा केळकर-बापट यांच्यासह कोअर कमिटीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका कार्यकर्ते मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

महापालिकेत महाआघाडीचा कार्यकाल वगळता 20 वर्षे एकहाती  काँग्रेसची सत्ता होती. मात्र, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने 42 जागा जिंकत  सत्ता काबीज केली. त्यानुसार महापौर, उपमहापौर, गटनेते निवडही पार पडल्या. पण याच कालावधीत भाजप नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. यामुळे शासकीय दुखवट्याने भाजपने विजयोत्सव साजरा केला नव्हता. 

यामुळे महापौर सौ. खोत, उपमहापौर सूर्यवंशी व गटनेते बावडेकर यांनी निवडीनंतरही जल्लोषासाठी पदभार स्वीकारला नव्हता. आज भाजपच्यावतीने भव्य मिरवणुकीने पदभार घेण्याची तयारी करण्यात आली होती. ज्या स्टेशन चौकातील जुन्या कार्यालयातून शून्यातून भाजपची सुरुवात झाली, तेथूनच या विजयी मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. 

झांजपथक, धनगरी ढोल-ताशे, डॉल्बीचा दणदणाट या मिरवणुकीत होता. उघड्या जीपमध्ये सौ. खोत, सूर्यवंशी व बावडेकर उभे होते. त्यांच्यासोबत फेटेधारी नगरसेवक - कार्यकर्ते आणि सर्वात पुढे आजी-माजी आमदार, खासदार, कोअर कमिटीचे सदस्य होते. स्टेशन चौक - राजवाडा चौक मार्गे महापालिकेत हे पदाधिकारी मिरवणुकीने आले. महापालिकेच्या दारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 

भाजपच्या या एंट्रीसाठी कार्यकर्त्यांनी महापालिकेतील पायर्‍यांवर फुले आणि रांगोळी घातली होती. विशेषतः महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेते यांची कार्यालये फुलांनी सजवून रांगोळी घालण्यात आली होती. 

जल्लोष करीत नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापौर सौ. खोत, उपमहापौर सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर यांना त्यांच्या - त्यांच्या केबिनमध्ये खुर्चीवर बसविले. यावेळी कार्यकर्त्यानी पक्षाचा जयघोष करीत त्यांचे अभिनंदन केले. तसेच भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महापालिका भगवेमय... भाजपचा झेंडा फडकला

महापालिकेत पहिल्यांदाच भाजप एंट्रीचा जल्लोष नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दणक्यात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी नगरसेवक-नगरसेविकांसाठी खास ड्रेसकोड ठरवण्यात आला होता. सर्वच नगरसेवकांनी भगवे शर्ट आणि फेटे परिधान केले होते. नगरसेविकांनी भगव्या रंगाच्या साड्या आणि फेटे परिधान केले होते. कार्यकर्ते, नेते-कार्यकर्तेही भगव्या फेट्यांमध्ये होते. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. मिरवणुकीने सर्वजण महापालिकेत आल्यावर तिथेही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान एका  उत्साही कार्यकर्त्याने महापालिकेच्या छतावर चढून भाजपचा झेंडा फडकवित सत्तांतर झाल्याचे दाखवून दिले.