Fri, Apr 19, 2019 12:47



होमपेज › Sangli ›  भाजपकडून जिल्ह्यात सत्तेचा गैरवापर : विश्वजीत कदम

 भाजपकडून जिल्ह्यात सत्तेचा गैरवापर : विश्वजीत कदम

Published On: Apr 09 2018 7:52PM | Last Updated: Apr 09 2018 7:45PM



सांगली : प्रतिनिधी

भाजप सरकार देशात जातीयवादाचे विष पेरत असून, दलित, मुस्लिमांवर अत्याचार करीत, त्यांचे अधिकार काढून घेत आहे. सर्वसामान्यांना आवाज दडपून भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपकडून जिल्ह्यात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. पोलिसांवरही हात उचलण्यापर्यंत सत्ताधार्‍यांची मजल गेली आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रात भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याने सामान्‍य जनतेचे दमन हा एककलमी कार्यक्रम त्यांच्याकडून सुरु आहे. सरकारकडून जाती-धर्मांत जाणीवपूर्वक तेढ निर्माण केली जात आहे. दलितांच्या संरक्षणासाठी असलेला कायदाही बदलाचा घाट घातला आहे. त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. संविधान बदलण्याचा घाटही भाजपने घातला आहे. सामान्यांच्या अधिकारावर गदा आणून लोकशाहीचा गळा घोटण्याचे हे काम आहे. महागाई कमी करण्याचे आश्‍वासन देणार्‍या भाजपने उलटा कारभार करीत महागाई वाढवली आहे. जनता भाजपच्या राजवटीला कंटाळली आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, राज्यात राष्ट्रवादीकडून हल्लाबोल यात्रा सुरु आहे. आगामी निवडणुका एकत्र लढविण्याबाबतचा निर्णय  दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेते घेतील. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करावी लागेल.

तासगावात सत्तेचा गैरवापर

तासगावमध्ये पोलिसांना मारहाण करण्याची घटना निंदनीय असल्याची टीकाही कदम व माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी खा. संजय पाटील यांचे नाव न घेता केली. हा सत्तेचा गैरवापर आहे. पोलिसांवरही हात उचलण्यापर्यंत सत्ताधार्‍यांची मजल गेली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags : sangli; sangali news, BJP, misuses, power, district