होमपेज › Sangli › आठवड्याभरात भाजपचे मिशन इनकमिंग

आठवड्याभरात भाजपचे मिशन इनकमिंग

Published On: May 29 2018 1:31AM | Last Updated: May 28 2018 8:16PMसांगली : अमृत चौगुले

मिशन महापालिकेसाठी भाजपने जोरदार व्यूहरचना केली आहे. त्याअंतर्गत सांगलीत दि. 4 व 5 मे रोजी होणारी राज्य कार्यकारिणीची बैठक ही ‘बुस्टर डोस’ देणारी ठरेल.  मुख्यमंत्री देवेंद फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील भाजपच्या मंत्र्यांची  फौज येथे दाखल होणार आहे. यानिमित्ताने होणार्‍या शक्‍तिप्रदर्शनासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. यामध्ये आजी-माजी 30 हून अधिक नगरसेवक-नगरसेविकांचे आठवड्याभरात मिशन इनकमिंग जोरात सुरू होणार आहे. 

जिल्ह्यातील लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, अनेक नगरपालिका, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीमध्ये भाजपने सत्ता काबिज केली आहे. त्यानंतर भाजपने आता मिशन महापालिका टार्गेट ठेवले आहे. त्यानुसार आता जोरदार मोर्चेबांधणीही सुरू आहे. वास्तविक आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांनी यापूर्वीच शहरात शासकीय निधीतून कोट्यवधी रुपयांचे रस्ते, गटारींसह विविध कामे केली आहेत. आतापर्यंत कधीच शहरात झाली नाहीत, एवढी कामे आमदार निधीतून करून जनमानसाच्या शहर विकासाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. शिवाय महापालिकेतील भ्रष्टाचाराचा  बोलबाला झाला आहे. या मनमानीपणाच्या  कारभाराने हैराण जनतेला भाजपरूपी विकासाच्यादृष्टीने आशेचा किरण दाखवून दिला आहे.

एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षांचे वार्डनिहाय जनतेने अनुभव घेतलेले आहेत. आलटून-पालटून सत्तेवर आलेले काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेने मनमानी कारभाराची  वाहती गंगाच सुरू ठेवली आहे. दुसरीकडे  शहराचा खुंटलेला विकास, दुरवस्था यामुळे जनता हैराण आहे. ड्रेनेज, पाणी, घरकुलसह विविध योजनांच्या निमित्ताने झालेला भ्रष्टाचाराचा लेखाजोखाही तयार आहे. त्यामुळे महापलिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपसाठी हे प्रचाराचे मोठे भांडवल तयारच आहे. सोबतच काँग्रेसमधील बेबनाव आणि राष्ट्रवादीतील नाराजी यामुळे अनेकजण विद्यमान, माजी नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. 

एकूणच या सर्वांचा मेळ घातला तर भाजपला महापालिका निवडणुकीत आयती रसदच मिळणार आहे. त्यांच्या जीवावर जिल्हा परिषदेचा फॉर्म्युला वापरून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याची भाजपने व्यूहरचना केली आहे. त्यादृष्टीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार पाटील, आमदार गाडगीळ, खाडे आदींनी इनकमिंगसाठी मशागत करूनही ठेवली आहे. त्यादृष्टीने प्रचाराद्वारे पेरणीचा मुहूर्त 4 मे रोजी होणार्‍या कार्यकारिणीच्या बैठकीचाच काढण्यात आला आहे. त्यादिवशीच सायंकाळी स्टेशन चौकात होणारी सभा आणि त्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ ही भाजपच्या प्रचाराचा नारळच असेल. भाजपच्या आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकीच्या तयारीचा आणि पुढे वाढत जाणार्‍या प्रचाराचा टेम्पो याचा अनुभव जनतेला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही त्या दिवसापासून जो प्रचाराचा भाजपचा धडाका सुरू होईल तो मनपा काबिज करण्याच्यादृष्टीने अन्य पक्षांच्यादृष्टीने अधिक गतिमान राहणार आहे.

अर्थात या सर्व तयारीबाबतची आणि होणार्‍या घडामोडींबाबत, नियोजनातही कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. परंतु आजी-माजी 30 हून अधिक नगरसेवकांचा प्रवेश हा निश्‍चित मानला जात आहे. त्यांच्या प्रवेशाद्वारे राष्ट्रवादी-काँग्रेसला मोठे खिंडार पडणार, हेही उघड आहे.  होणारी निवडणूक ही व्यक्‍तिसापेक्ष असल्याने साहजिकच हे 30 हून अधिक ‘विनिंग’ मेरिटचे उमेदवारच भाजपला मिळणार, हे उघड आहे.  नव्या-जुन्यांचा मेळ घालत भाजपने पालिका सत्तेची वाटचाल करण्याचा ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. जनतेसमोर तो 4 जूनपासून खुला होणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून होणार पंचनामा अन् अनेक घोषणा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच नगरविकास खाते आहे. त्यामुळे महापालिकेतील आतापर्यंत झालेल्या अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा पुराव्यासह लेखाजोखा त्यांच्याकडे आहे. अगदी विशेष लेखापरीक्षणातील घोटाळ्यांपासून ते ड्रेनेज, घरकुल, पाणी योजनेतील भ्रष्टाचाराची आणि त्यात सहभागी असणार्‍यांची कुंडलीच त्यांच्याकडे पोहोचविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रचारसभेत साहजिकच महापालिकेच्या भ्रष्टाचाराचा ते पोलखोल करीत कारवाईचा बडगाही घोषित करतील. सोबतच महापालिकेला कुपवाड ड्रेनेज योजनेसह काही योजनांचीही ते घोषणा करण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या नेतृत्व अभावाचाही फायदा; 

नवा पर्यायमहापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी, स्वाभिमानीसह विविध पक्षांचे पर्याय जनतेने अनुभवले आहेत. परंतु शहराचा परिपूर्ण विकास होऊ शकला नाही. त्या तुलनेत भाजप पहिल्यांदाच सक्षम पर्याय म्हणून समोर येणार आहे. केंद्र , राज्यात भाजपची सत्ता आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारमुक्‍त कारभाराचा सक्षम पर्याय जनतेला ‘अपील’ होणारा आहे.  दुसरीकडे सत्ताधारी काँग्रेस गटबाजीत विभागणी आहे.  मदनभाऊ पाटील, डॉ. पतंगराव कदम यांच्यासारखे खंबीर नेते आता हयात नाहीत. त्याचा भाजपला फायदा होणार आहे.