Thu, Jul 18, 2019 22:06होमपेज › Sangli › भाजपला सांगली आताच आठवली का?

भाजपला सांगली आताच आठवली का?

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 11:28PMसांगली : प्रतिनिधी 

सांगलीने भाजपला आमदार दिला, पण गेल्या साडेचार वर्षांत राज्य सरकारने महापालिकेच्या विकासासाठी काहीही केले नाही. त्यांना सांगली आताच का आठवली, असा सवाल राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे येऊन हजारो कोटी देण्याच्या घोषणा करण्याची शक्यता आहे, पण त्यांचा पूर्वानुभव लक्षात घेता, त्या घोषणांना भुलू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीच्या प्रभाग 16 मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी बदाम चौक येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.ते म्हणाले, सांगलीकडे दुर्लक्ष करणारे भाजपचे मंत्री आता मतांचा जोगवा मागण्यासाठी गल्लीबोळात फिरतील. पण त्यांच्यावर अजिबात विश्‍वास ठेवू नका. कारण आजपर्यंत भाजपने दिलेले कोणतेही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. जगभरात इंधन स्वस्त असताना महाराष्ट्रात मात्र ते सर्वाधिक महाग करण्याचे पाप केंद्र व राज्य सरकारने केले आहे. इंधन करावरच या सरकारचा कारभार सुरू आहे. त्यामुळे महागाई वाढत आहे.  

आमदार पाटील म्हणाले,  अनेकांना  कोर्टात दावे करायला लावून भाजपनेच मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत आरक्षणाला  खो घातला आहे. उद्योगपती बँका बुडवून परदेशात पळून जात असताना भाजपवाले मात्र मूग गिळून का गप्प आहेत, हे सर्वश्रुत आहे. दिलेली आश्‍वासने पाळू शकलो नाही म्हणून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी समाजात जातीय तेढ वाढविण्याचे काम भाजप नेते करीत आहेत.
ते पुढे म्हणाले, भाजप म्हणजे भूलथापा मारणार्‍यांचा पक्ष आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता भाजपचे नेते येऊन मोठ-मोठी आश्‍वासने देतील. सांगलीसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी देण्याच्या घोषणा करतील. पण नेहमीप्रमाणे ती आश्‍वासने पोकळ ठरतील. या भूलथापांना जनतेने भुलू नये.या वेळी कॉँग्रेस नेत्या जयश्री पाटील,  शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, संजय बजाज, श्रीनिवास पाटील, उत्तम साखळकर, हारूण शिकलगार, पुष्पलता पाटील, सुरेश पाटील, ताजुद्दीन तांबोळी, पद्माकर जगदाळे, मयूर पाटील,  सागर घोडके उपस्थित होते.