म्हैशाळ : वार्ताहर
भाजप आता अडवाणी, वाजपेयी यांचा राहिला नसून साम, दाम, दंड, भेद याचा वापर करणार्या धनिकांचा पक्ष बनला आहे. धनशक्तीचा उपयोग करून निवडणुका जिंकायचा, हा एककलमी कार्यक्रम भाजप राबवित असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. म्हैसाळ येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत बांधलेल्या पाण्याच्या नूतन टाकीचे लोकार्पण, कुमुदिनी महिला पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, मातंग समाज मंदिर भूमिपूजन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील होते.
जयंत पाटील म्हणाले, भाजप सत्तेच्या काळात महाराष्ट्र विकासात खूप मागे पडला. राज्यात कोणी गुंतवणूक करायला तयार नाही. भाजपने तरूणांना रोजगाराचे गाजर दाखविले. नोकर्या, रोजगार देण्याचे पोकळ आश्वासन दिले. मात्र तरूणांमध्ये फसगत झाल्याची भावना आहे.
दिलीप पाटील म्हणाले, भाजप सरकार सहकार मोडीत काढण्याचे काम करीत आहे. मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, सुभाष खोत यांची भाषणे झाली. जयंत पाटील यांचा माजी सरपंच जयसिंगराव शिंदे यांच्याहस्ते यांचा सत्कार करण्यात आला. दिलीप पाटील यांचा सत्कार मनोज शिंदे यांनी केला. सरपंच सौ. मनोरमादेवी शिंदे - म्हैसाळकर, कैलाससिंग शिंदे, अण्णासाहेब पाटील, गिरीजादेवी शिंदे, उपसरपंच लता शिंदे, सदस्य परेश शिंदे, बी. एन. कोगनोळे, नरसिंह संगलगे, नामदेव कोळीउपस्थित होते.