होमपेज › Sangli › भाजप आश्रयाला जाऊनही राज्य सहकारी संघ उपेक्षितच

भाजप आश्रयाला जाऊनही राज्य सहकारी संघ उपेक्षितच

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 11:08PMसांगली : उध्दव पाटील

काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेला महाराष्ट्र राज्य सहकारी संघ भाजपच्या आश्रयाला जाऊनही उपेक्षितच राहिला आहे. राज्य संघाला शिक्षण निधी सुरू करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र पाच महिने झाले तरी आश्‍वासनपूर्ती झाली नाही. तुटीमुळे राज्य संघ आर्थिक गर्तेत सापडला आहे. अधिकारी, प्राध्यापक, कर्मचार्‍यांचे सोळा महिन्यांचे वेतन थकले आहे. 50 दिवस झाले तरी कर्मचारी संप ‘बेदखल’ आहे. सहकार प्रशिक्षण महाविद्यालये, जिल्हा व विभागीय सहकारी मंडळांचे काम ठप्प  झाले आहे. शताब्दि वर्षात राज्य सहकारी संघावर ही आफत ओढवली आहे. 

संघाची निवडणूक मार्चमध्ये झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन पॅनलला 18 , तर भाजप पुरस्कृत सहकार पॅनलला 3 जागा मिळाल्या. मात्र भाजपचे आमदार प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनी भाजप नेते व वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून ‘परिवर्तन’च्या एका गटाशी संधान साधले. संघाला शिक्षण निधी पूर्ववत सुरू करण्याचे आश्‍वासन देत राज्य संघाची अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव निवडणूक आपल्या वर्चस्वाखाली झाल्याचे जाहीरपणे दाखविले. राज्य संघाच्या अध्यक्षपदी  राष्ट्रवादीचे डॉ. प्रताप पाटील (सांगली) व मानद सचिवपदी काँग्रेसच्या विद्या पाटील (लातूर) यांची निवड झाल्यानंतर ते थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. मुख्यमंत्र्यांचा ‘आशीर्वाद’ घेतला.  शिक्षण निधी सुरू करण्याचा शासन आदेश महिन्यात काढला जाईल, असे आश्‍वासन दिले. मात्र अजूनही  पूर्ती झाली नाही. राज्य सहकारी संघाची अवस्था दीनवानीच राहिली आहे. 

गुजरातच्या धर्तीवर अनुदान हवे 

संघ तुटीत असल्याने 16 महिन्यांचा पगार थकला आहे. त्यामुळे  सर्व कर्मचारी दि. 4 जुलैपासून संपावर आहेत. राज्य संघाशी संलग्न 47 संस्थांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. संपाला 50 दिवस झाले तरिही हे आंदोलन सुरू आहे. संप शासनाकडून बेदखल आहे. शिक्षण निधी सुरू करणे व गुजरातच्या धर्तीवर शासन अनुदान देणे गरजेचे आहे.