Thu, Apr 25, 2019 18:32होमपेज › Sangli › भाजप पैशाने उमेदवार विकत घेत आहे

भाजप पैशाने उमेदवार विकत घेत आहे

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 06 2018 10:40PMसांगली : प्रतिनिधी

निवडणुका जिंकण्यासाठी  मतदार, उमेदवारांना विकत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत  केला. महापालिका निवडणुकीसाठी खासदार किर्तीकर यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. निवडणुकीचे नियोजन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  यावेळी संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य पृथ्वीराज पवार , नगरसेवक गौतम पवार, शेखर माने,  शंभूराज काटकर आदि उपस्थित होते. 

किर्तीकर म्हणाले,  मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंधी,जीएसटी या निर्णयांचा फटका सामान्य जनतेला बसलेला आहे. त्यामुळे या सरकारवरील जनतेचा विश्‍वास उडालेला आहे. तरी सुद्धा पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते प्रयत्न करीत आहेत. ते स्वतः जनतेतून निवडून येऊ शकत नसल्याने पाठीमागील दाराने मराठा कार्डच्या जीवावर पदावर आहेत. पैसे देऊन लोकांना खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र खरी वस्तुस्थिती कळाल्याने जनता आता त्यांना जागा दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही. 

ते म्हणाले, शिवसेनेची निवडणुकीची तयारी  जोरदार सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पक्षाचे स्टार प्रचारक प्रचारासाठी येथे येणार आहेत. आम्ही कोणाबरोबर  युती न करता स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. गेल्या दहा वर्षांत येथील जनतेला आवश्यक सुविधा मिळालेल्या नाहीत.  जनतेसमोर  आमचा वचननामा लवकरच सादर करणार आहे. कोणत्याही स्थितीत  महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. 

पवार गट आमच्या बरोबरच : खासदार किर्तीकर 

माजी आमदार संभाजी पवार यांच्या गटाचा प्रश्न पुन्हा पुढे आला. मात्र आज पक्षाच्या बैठकीस नगरसेवक गौतम पवार आणि पृथ्वीराज पवार उपस्थित होते. त्यासंदर्भात खासदार किर्तीकर म्हणाले, हा गट शिवसेनेबरोबरच आहे.  त्यांनी केलेल्या  मागणीनुसार त्यांना जागा देण्यात येणार आहेत. 

भिडे गुरुजींनी घेतली कीर्तीकर यांची भेट

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेगुरुजी यांनी आमराई क्‍लब येथे खासदार  किर्तीकर यांची भेट घेतली. त्याबाबत किर्तीकर म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भिडेगुरुजी भेटणार आहेत. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते  आज आले होते.