Tue, Mar 19, 2019 03:15होमपेज › Sangli › भाजपने आरक्षणाचा प्रश्‍न लटकविला 

भाजपने आरक्षणाचा प्रश्‍न लटकविला 

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 25 2018 11:30PMकुपवाड : वार्ताहर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा, लिंगायत, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न लटकविला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत पाटील बोलत होते. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील,माजी मंत्री सतेज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, संजय बजाज, कमलाकर पाटील, श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते. 

आमदार  पाटील म्हणाले, पंतप्रधान व मुख्यमंत्री  पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांना निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्‍वासनांचा विसर पडला आहे. भाजप हे फक्‍त निवडणूक लढविण्याचे यंत्र बनले आहे. मुख्यमंत्र्यांनी जिथे जिथे जाऊन आश्‍वासने दिली, त्यापैकी एकाचीही पूर्तता त्यांनी केली नाही. भाजप हा खोटारड्यांचा पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. 

पाटील पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज, घनकचरा प्रकल्प राबविला. पण केंद्रात व राज्यात गेली चार वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला कधीही सांगलीची आठवण झाली नाही. मते घेतल्यावर भाजपच्या आमदारांनाही सांगलीचा विसर पडलेला आहे. आता निवडणूक असल्याने भाजपचे मंत्री चौका-चौकात सभा घेतील. वारेमाप आश्‍वासने देतील. सांगलीला हजार,  दोन हजार कोटींचा निधी देऊ असे सांगतील, पण त्यांनी आजवर दिलेली आश्‍वासने खोटी ठरली आहेत. हे जनतेने लक्षात ठेवले पाहिजे. 

आमदार सतेज पाटील म्हणाले, केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. अच्छे दिन येतील असे  स्वप्न दाखवित जनतेला फसवी आश्‍वासने देत त्यांनी सत्ता मिळविली आहे. पण त्यांनी चार वर्षांत सर्वसामान्य नागरिकांचा खिसा कापण्याचाच उद्योग केला आहे. महिलांना घर चालविताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 
यावेळी प्रतिक पाटील,  जयश्री पाटील यांची भाषणे झाली.