होमपेज › Sangli › भाजप सरकारने महागाई वाढवली : विश्‍वजित कदम 

भाजप सरकारने महागाई वाढवली : विश्‍वजित कदम 

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 09 2018 9:57PMआटपाडी : वार्ताहर

ग्रामीण भागासह शहरी भागातील जनता, शेतकरी, कामगार, विद्यार्थी नाखूश आहेत.लोकांना, शेतकर्‍यांना आधार देण्याऐवजी भाजप सरकारने सातत्याने महागाई वाढवली, अशी टीका युवक काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ.विश्‍वजित कदम यांनी केली.

नेलकरंजी (ता.आटपाडी) येथे डॉ.कदम यांची आमदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच या भागातील काँगे्रस नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचाही  नागरी सत्कार झाला. त्यावेळी आमदार डॉ.कदम बोलत होते.

माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, युवक काँगे्रसचे सांगली जिल्हा लोकसभा क्षेत्र उपाध्यक्ष जयदीप भोसले, प्रतापशेठ साळुंखे, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, इंद्रजित साळुंखे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी.एम.पाटील, शिवाजीराव पाटील, सरपंच बाबासाहेब भोसले प्रमुख उपस्थित होते.

डॉ.कदम म्हणाले, (स्व.)मोहनराव भोसले यांनी तळमळीने, निष्ठेने गावाची सेवा केली. त्यांनी केलेल्या कामाचा हा विजय आहे.या भागातील गावांना विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ.  नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना लोकांनी  विश्‍वासाने काम करण्याची संधी दिली आहे. ती एक जबाबदारी आहे. ती चांगल्याप्रकारे पार पाडावी असे आवाहन डॉ.कदम यांनी केले. जयदीप भोसले म्हणाले , नेलकरंजीत सरपंचपदासाठी खुले आरक्षण निश्चित झाले.त्यानंतर जनतेतून बाबासाहेब भोसले यांचे नाव पुढे आले होते.तसेच या भागातील प्रत्येक गावात काँगे्रसच्या विचाराची माणसे आहेत. यापुढे आमदार डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तालुका काँगे्रसमय करूया असे आवाहन भोसले यांनी केले.

दरम्यान सरपंच भोसले, मानेवाडीचे सरपंच अमोल खरात, कानकात्रेवाडीच्या सरपंच रेखा दिलीप तनपूरे, वलवणचे सरपंच दगडू गेजगे, पंचायत समितीच्या सदस्या सारिका भिसे, चिंचाळेचे उपसरपंच सुरेंद्र गायकवाड यांच्यासह नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शशिकांत भोसले यांनी प्रास्ताविक केले.
जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, प्रदीप पाटील, अ‍ॅड.विलास देशमुख, राहुल गायकवाड, ग्रामपंचायत आनंदराव भोसले  यांच्यासह काँगे्रस पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.