Sat, Apr 20, 2019 23:59होमपेज › Sangli › खंजीर खुपसून आता दादांच्या नावे मतांचा जोगवा

खंजीर खुपसून आता दादांच्या नावे मतांचा जोगवा

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 16 2018 12:05AMसांगली : प्रतिनिधी

महाराष्ट्राला समृद्ध करणार्‍या सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला. त्यांच्या नेतृत्वाखालीच काँगेस महापालिका निवडणूक लढवत मतांचा जोगवा मागताहेत, असा टोला पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी लगावला. त्यांचा अपमान करणार्‍यांना या निवडणुकीत लाथाडून धडा शिकवा, असे आवाहन देशमुख यांनी केले.

महापालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ रविवारी येथील गणपती मंदिरासमोर झाला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, अमर साबळे, आमदार सुधीर गाडगीळ,  सुरेश खाडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदी उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, महाराष्ट्राला घडविण्यात वसंतदादांचा मोठा वाटा आहे. त्यांचा सांगली जिल्ह्याला मोठा वारसा आहे. परंतु दुर्दैवाने ज्या दादांनी  सांगली विकसविली त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या नावाच्या सर्वच संस्था नेस्तनाबूत झाल्या आहेत. यामुळे त्यांना किती वेदना झाल्या असतील? आज दादांचे वारसदार त्यांचे नावही घेत नाहीत. मात्र ज्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिका निवडणूक लढवित आहे.  काँग्रेसला याची लाज वाटली पाहिजे. केवळ सत्ता बळकविण्यासाठी  आणि महापालिकेत दरोडेखोरीसाठी ही टोळी एकत्र आली आहे. यांना 20 वर्षे सत्ता देऊन यांनी वाटोळेच केले. त्यामुळे यांना जनता घरात बसविल्याशिवाय राहणार नाही. एकदा भाजपला सत्ता द्या, तुमच्या मनातील स्मार्ट सांगली बनविल्याशिवाय गप्प बसणार नाही.  

हळवणकर म्हणाले, महापालिकेत कांँग्रेसची 20 वर्षे सत्ता आहे. पण नागरिकांना पाणी, रस्ते, गटारी आदी सुविधाही दिलेल्या नाहीत. दोन कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  भाजप सत्तेवर आल्यानंतर शेरीनाल्यासाठी 13 कोटीचा निधी आणून नदीचे प्रदूषण थांबविले जाईल. 

संजय पाटील म्हणाले, अनेक वर्षे भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेसच्या कारभाराने जनता त्रासली आहे. काँग्रेस कारभारामुळे या शहराचा विकास थांबला. मिरजेच्या पाणी योजनेचा समावेश अमृत योजनेत केलेला असतानाही न्यायालयात जावून याला खिळ घालण्याचा प्रयत्न केला. 

भर पावसात शपथ

भाजपाने सर्व उमेदवार डोक्याला फेटा, खांद्यावर भाजपचा पट्टा अशा वेशभूषेत उभे होते. भर पावसात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी सर्व उमेदवारांना पारदर्शी, गतिमान, विकासाभिमुख, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ दिली. यावेळी दीपक शिंदे-म्हैसाळकर, भारती दिगडे, वैभव शिंदे, मुन्ना कुरणे, सुयोग सुतार, श्रीकांत शिंदे आदींसह अनेकजण उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष दानवे आलेच नाहीत

भाजपच्या प्रचारप्रारंभासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे येणार होते. ते पुण्यापर्यंत आले, पण तेथून पावसामुळे त्यांचे हेलिकॉप्टर उड्डाणच करू शकले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांचा दौरा रद्द झाला. अखेर देशमुख यांनी प्रचारप्रारंभ केला.