Thu, Apr 25, 2019 08:05होमपेज › Sangli › मराठा आरक्षण देण्याची भाजप, संघाची मानसिकता नाही

मराठा आरक्षण देण्याची भाजप, संघाची मानसिकता नाही

Published On: Jul 28 2018 1:40AM | Last Updated: Jul 28 2018 12:31AMसांगली : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण देण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपची  मानसिकता दिसत नाही. असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी  पत्रकार परिषदेत केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याची उंची भाजपने खुज्या विचाराने जाणिवपूर्वक कमी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.ते म्हणाले, मराठा आरक्षणबाबत सरकारने न्यायालयात समाजाची बाजू ठामपणे मांडायला हवी होती. पण याबाबत सरकारने वेळकाढूपणा केला. यामुळेच  समाजातील तरुणांच्या सहनशक्तीचा अंत होवून  आंदोलन पेटले आहे. इतके होवूनही सरकार मात्र गप्प आहे. 

ते पुढे म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याबाबतही भाजपकडून खुज्या विचारांचे राजकारण केले जात आहे. गुजरातमधील सरकार पटेल यांच्यापेक्षा छत्रपती यांच्या पुतळ्याची उंची कमी रहावी, या हेतूनेच सरकारने 160 मीटरचा पुतळा 126 मीटरपर्यंत कमी केला. चुबतरा मात्र 132 वरून 184 मीटर केला. स्मारकासाठी आघाडी सरकारच्या काळातील 2800 कोटींची निविदा 3800 कोटीपर्यंत कशी वाढली? वादंग निर्माण झाल्यानंतर पुतळ्यापेक्षा तलवारीची उंची वाढविण्याचा चुकीचा निर्णय घेण्यात आला. या वेळी प्रतीक पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रकाश सातपुते, डॉ. नामदेव कस्तुरे  उपस्थित होते. 

आठ दिवसांत धनगर आरक्षण द्यायचे काय झाले? 

निवडणुकीपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी  भाजप सरकार आल्यास आठ दिवसांत धनगर समाजाला आरक्षण देणार असे ठोकून दिले होते. पण आज साडेचार वर्षे झाली. केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे. मात्र अजूनही धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही. मुस्लिम समाजाच्या पाच टक्के आरक्षणालाही भाजपने आडकाठी आणली आहे. यामुळे भाजपने या दोन्ही समाजाची फसवणूक व विश्‍वासघात केल्याचे सिध्द होते, असेही चव्हाण म्हणाले.