होमपेज › Sangli › निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची गुंडगिरी

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची गुंडगिरी

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 27 2018 12:15AMसांगली : प्रतिनिधी

शहराच्या विकासात पाच वर्षे खो घालणार्‍या भाजपला आता महापालिकेतील सत्तेचे डोहाळे लागले आहेत. परंतु जनतेतून प्रतिसाद नसल्याने ते आता निवडणुकीपूर्वीच गुंडगिरीच्या थराला गेले आहेत, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला. विजयनगर येथे प्रभाग 8 मध्ये जनसंपर्क सभेत ते बोलत होते. विरोधी नगरसेवकांच्या घरावर हल्ले करून दहशत माजविणारे उद्या शहराचा काय विकास करणार, असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, युवानेते विशाल पाटील, पक्ष निरीक्षक प्रकाश सातपुते, प्रा. सिकंदर जमादार आदि उपस्थित होते. पाटील म्हणाले, सांगली शहर व जिल्ह्याने त्यांच्या भूलथापांना भुलून भरभरून मते दिली. परंतु गेल्या चार वर्षांत मंत्रिपद मिळाले नाही आणि विकासाला निधी मिळाला नाही. उलट काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावरभाजपने  सूड उगविला. विकासकामांचा निधी अडविला,  उलट  करांचा बोजा लादून उद्योग-व्यवसाय मोडीत काढला आहे.  

काँग्रेसने महापालिकेच्या माध्यमातून शहरात 200 कोटींची विकासकामे केली. पाणी, ड्रेनेज, घरकुलांसह विविध योजना पूर्ण केल्या. रस्ते खड्डेमुक्‍त केले. उलट भाजपने काय दिले ?जयश्री पाटील म्हणाल्या,    महापालिका काँग्रेसकडे असल्याने भाजपने अडवणूक केली.  विशाल पाटील म्हणाले, भाजपचे आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे. त्याची सुरुवात  महापालिका निवडणुकीतूनच होईल.   रवींद्र खराडे, नितीन कुरळपकर, प्रकाश पाटील, अर्चना कोळेकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.