Thu, Feb 21, 2019 05:40होमपेज › Sangli › भाजपने बॅगा संस्कृती आणली

भाजपने बॅगा संस्कृती आणली

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 26 2018 1:39AMसांगली : प्रतिनिधी

भाजपने लोकसेवा गुंडाळत बॅगा संस्कृती आणली आहे. लोकांचे प्रश्‍न, विकास याच्याशी त्यांचा संबंध राहिला नाही. भाजप हा निवडणूक जिंकण्याचे यंत्र झाला आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील मतदार भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांदणी चौकातील सभेत केली. युवक काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष  आमदार विश्‍वजित कदम, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, श्रीनिवास पाटील, प्रभाग क्रमांक सतरामधील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार व नागरिक उपस्थित होते. 

जयंत पाटील म्हणाले, भाजपचे नेते केवळ घोषणा करतात. अनेक आश्‍वासने देतात. मात्र आश्‍वासनांची पूर्तता करत नाहीत. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास 6500 कोटींचा निधी दिला जाईल, अशी घोषणा केली होती. राज्यात भाजपची सत्ता आली पण सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला एक दमडी अनुदान दिलेले नाही. भाजपने सत्ता आणलेल्या अन्य शहरांमध्येही अशीच स्थिती आहे. त्यामुळे भाजप नेते, मंत्र्यांच्या मोठ्या गप्पा आणि आश्‍वासनांना सांगलीची जनता बळी पडणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा विजय होईल. 

जयश्री पाटील म्हणाल्या, जातीयवादी भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली आहे.  महापालिकेतील मोठे पद ज्यांना दिले तेच कसोटीच्या काळात काँग्रेसला सोडून गेल्याची टीकाही त्यांनी  भाजपच्या एका उमेदवाराला उद्देशून केली. आमदार कदम म्हणाले, खोटी स्वप्ने दाखविणार्‍या भाजपला जनता ओळखून आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव निश्‍चित आहे. केंद्र, राज्यातील भाजप शासनाने सांगली महापालिकेला निधी दिला नाही. दुजाभाव केला, अशी टीकाही त्यांनी केली.