Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Sangli › मिरजेत भाजप, राष्ट्रवादीची बाजी, काँग्रेसचा सफाया

मिरजेत भाजप, राष्ट्रवादीची बाजी, काँग्रेसचा सफाया

Published On: Aug 04 2018 1:36AM | Last Updated: Aug 03 2018 10:34PMमिरज : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा येथे  सुपडासाफ झाला. भाजपने 23 पैकी 12 जागा जिंकून बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा तर काँग्रेसला केवळ 3 जागा मिळाल्या. शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही.

या निवडणुकीत माजी महापौर मैनुद्दीन बागवान  विजयी झाले. मात्र माजी महापौर किशोर जामदार, इद्रीस नायकवडी, विवेक कांबळे यांना दारुण पराभव पत्कारावा लागला. किशोर जामदार, इद्रीस नायकवडी पराभूत झाले असले तरी त्यांचे पुत्र करण जामदार व अतहर नायकवडी विजयी झाले. काँग्रेसतर्फे संजय मेंढे व त्यांच्या पत्नी बबीता  हे पती, पत्नी विजयी झाले आहेत.  सुरेश आवटी यांचे संदीप आवटी व निरंजन आवटी हे दोन्ही पुत्र विजयी झाले आहेत.

मिरजेमध्ये प्रभाग क्र. 4 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्षांची करण्यात आलेली आघाडी फसली आहे. आघाडीच्या चारही उमेदवारांना दारुण पराभव पत्कारावा लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि जनता दलातून भाजपमध्ये गेलेले मात्र विजयी झाले आहेत. विवेक कांबळे यांना मात्र पराभव पत्करावा लागला. या निवडणूक निकालामुळे प्रथमच मिरजेत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्यावेळी 7 जागा होत्या. त्या आता 8 झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात एका जागेची भरच पडली आहे.

प्रभाग क्र. 3 मध्ये भाजप, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या तिरंगी लढतीत चारही जागा जिंकून भाजपने बाजी मारली आहे. या प्रभागात भाजपच्या अनिता वनखंडे, शिवाजी दुर्वे, शांता जाधव आणि संदीप आवटी  विजयी झाले आहेत. काँग्रेसचे अजित दोरकर यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार  पराभूत झाले. सुरुवातीला काहीवेळ काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. परंतु भाजपने काँग्रेसची आघाडी मोडीत काढून विजय मिळवला.

प्रभाग क्र. 4 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अनिलभाऊ  कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली चार अपक्षांच्या आघाडीचा प्रयोग करण्यात आला होता. परंतु हा प्रयोग फसला. भाजपने  या प्रभागातील चारही जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. या प्रभागात भाजपचे पांडुरंग कोरे, अस्मिता सरगर, मोहना ठाणेदार आणि निरंजन आवटी हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

प्रभाग क्र. 5 मध्ये मात्र भाजपला रोखण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या दोन उमेदारांविरुद्ध मैत्रीपूर्ण लढत दिली होती. प्रतिष्ठेच्या लढतीत काँग्रेसचे संजय मेंढे व त्यांच्या पत्नी बबीता  आणि करण जामदार विजयी झाले. इद्रीस नायकवडी यांना मात्र पराभव पत्कारावा लागला. मैत्रीपूर्ण लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालन हुलवान या  विजयी झाल्या.

प्रभाग क्र. 6 मधील प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने चारही जागांवर बाजी मारली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मैनुद्दीन बागवान, अतहर नायकवडी, नरगीस सय्यद व रझीया काझी या विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्र. 20 मधील तीनही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. या प्रभागात विवेक कांबळे पराभूत झाले. विजयी झालेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेंद्र थोरात, संगीता हारगे आणि प्रियांका पारधी यांचा समावेश आहे.

प्रभाग क्र. 7 मधील चारही जागा भाजपने जिंकल्या.  किशोर जामदार  यांना  मात्र  पराभव पत्करावा लागला. भाजपकडून विजयी झालेल्यांमध्ये गणेश माळी, आनंदा देवमाने, गायत्री कुळ्ळोळी आणि संगीता खोत यांचा समावेश आहे. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करुन मोठा जल्लोष केला. आणि बंदी आदेश असूनही  भव्य मिरवणुका काढल्या.  आमदार सुरेश खाडे यांनी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून त्यांना उमेदवारी दिली.  ते विजयीही झाले. त्यामुळे भाजपला प्रथमच मिरज शहरात 12 जागा मिळाल्याने आ. खाडे यांचेही राजकीय वजन वाढले आहे. एमआयएमनेही या निवडणुकीत जनतेचा कौल आजमावण्याचा प्रयत्न केला.  त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. ओवेसी यांची मिरजेत मोठी सभा झाली. परंतु या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

पिता हरले, पुत्र जिंकले...

महापालिका निवडणुकीत प्रतिष्ठेच्या लढतीत किशोर जामदार, इद्रीस नायकवडी हे हरले. मात्र त्यांचे पुत्र करण जामदार, अतहर नायकवडी  विजयी झाले. माजी महापौर विवेक कांबळे यांनाही पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून मैनुद्दीन बागवान पाचव्यांदा विजयी झाले. सुरेश आवटी यांचे दोन्ही पुत्र संदीप व निरंजन विजयी झाले. तीन प्रमुख प्रस्थापितांना धक्का बसला असला तरी तरुणांनाही चांगली संधी मिळाली आहे. प्रभाग क्र. 5 मध्ये संजय मेंढे व बबीता मेंढे हे पती, पत्नी विजयी झाले.