Thu, Apr 25, 2019 21:29होमपेज › Sangli › भाजपच्या गोवा सहलीचा आघाडीकडून निषेध

भाजपच्या गोवा सहलीचा आघाडीकडून निषेध

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 10:43PMसांगली : प्रतिनिधी

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले, त्याच दिवशी भाजपच्या नगरसेवकांची गोवा सहल आयोजित करण्यात आली. यावरून सोमवारी महासभेदरम्यान सभागृहात निषेधनाट्य रंगले. महापौर, उपमहापौर निवडीसाठी भाजपचे नगरसेवक थेट गोव्यातून आले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी त्यांचे निषेधाचे फलक झळकावून  उपरोधात्मक  स्वागत केले.

निवडसभेच्या प्रारंभीच वाजपेयी यांना श्रद्धांजलीवरून आघाडी-भाजपमध्ये मतभेद झाले. काँग्रेसने ‘प्रथम श्रद्धांजली, नंतर निवड’ अशी भूमिका घेत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे नगरसेवक आणि प्रशासनाला त्यावर नमते घ्यावे लागले.  वाजपेयी यांचे दि.16 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्याच दिवशी भाजपचे नगरसेवक गोवा सहलीला गेले. यावरून भाजपवर काँग्रेस-राष्ट्रवादीसह विविध स्तरातून टीका होत आहे. परंतु भाजपकडून मात्र सदस्य विश्रांतीसाठी गेल्याचे सांगण्यात आले होते. 

आज निवडीसाठी भाजपचे नगरसेवक सहलीवरून थेट सभागृहात आले. यावेळी काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहात भाजप नगरसेवकांच्या विरोधात फलक फडकावले. ‘अटलजींच्या निधनाने संपूर्ण भारत दु:खसागरात... गोवा सहलीतून परतलेल्या भाजप नगरसेवकांचे सहर्ष स्वागत’ व ‘अटलजींच्या दुःखद निधनानंतरही गोवा सहल यशस्वी पूर्ण केल्याबद्दल भाजप नगरसवेकांचे अभिनंदन’ अशा घोषणांचे कागदी फलक दाखवत सभागृहात भाजपचा निषेध केला.

वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यावरून वाद

सभा सुरू होताच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आधी  वाजपेयी यांना ‘श्रध्दांजली, नंतर निवड’ असा पवित्रा घेतला. सभेपूर्वी वाजपेयी यांना श्रध्दांजली वहावी अशी मागणी काँग्रेसचे मंगेश चव्हाण यांनी केली.  यावरून गोंधळ झाला. भाजपचे  जगन्नाथ ठोकळे यांनी मात्र निवड झाल्यानंतर श्रध्दांजली वहावी अशी मागणी केली. यावरून वाद जुंपला.
अखेर निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजित राऊत यांनी दोन मिनिटे श्रद्धांजली वाहून निवड सभा घेऊ, असा तोडगा काढला. मात्र कोणाचेही भाषण होणार नाही, असे स्पष्ट केले. भाजपनेही नमते घेतले. त्यामुळे श्रद्धांजली वाहून निवडी पार पाडण्यात आल्या.

सभेनंतर भाजपची श्रद्धांजली 

महापौर, उपमहापौर निवडीनंतर भाजपच्यावतीने सभागृहात  वाजपेयी यांचे प्रतिमापूजन करून श्रद्धांजली वाहिली. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, शरद नलावडे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

जो जसा करतो, तसे त्याचे विचार - गाडगीळ

काँग्रेस-राष्ट्रवादीनेभाजप सदस्यांच्या गोवा सहलीवरून टीकेची झोड उठविली आहे. याबाबत विचारले असता आमदार गाडगीळ म्हणाले, जो जसा विचार करतो तेच त्यांना सुचते. तसेच त्यांचे विचार, संस्कृती असते. दिनकर पाटील म्हणाले, नगरसेवक हे विश्रांतीसाठी गेले होते, मौजमजेसाठी नव्हे. मात्र वीस वर्षे काँग्रेस आघाडी सत्तेत असताना सत्तेची गणित मांडताना त्यांच्या काळात तेच होत होते. त्यांनी आमच्यावर टीका करताना आपल्या कर्तृत्वाचा विचार करावा.