Sun, May 26, 2019 00:57होमपेज › Sangli › मनपा सत्तेसाठी भाजपचे काँग्रेसीकरण

मनपा सत्तेसाठी भाजपचे काँग्रेसीकरण

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 06 2018 10:37PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी भाजपने आता काँग्रेस-राष्ट्रवादीतून उमेदवार आयातीसाठी पायघड्या घातल्या आहेत. त्यामुळे भाजपचे काँग्रेसीकरण झाल्याचा आरोप नागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे यांनी पत्रकार बैठकीत केला. ते म्हणाले, सत्तेसाठी वाट्टेल ते या हेतूने भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील भ्रष्ट व लुटारूंना पाठबळ देत आहे.  त्यामुळे आम्ही आता या तीनही पक्षांच्या गैरकारभाराविरोधात लढण्यासाठी मनपा निवडणुकीत जिल्हा सुधार समितीसोबत राहणार आहोत.  त्यांच्या व्यासपीठावर जाऊन भ्रष्ट कारभार जनतेसमोर मांडणार आहोत. 

बर्वे म्हणाले, महापालिका स्थापन झाल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकहाती कारभार सुरू आहे. त्या माध्यमातून शहर विकासाऐवजी भ्रष्टाचाराची मालिकाच सुरू आहे. वास्तविक त्या भ्रष्ट कारभाराविरोधात आमची लढाई सुरू आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात अनेक दावे दाखल केले. त्यामुळे विशेष लेखापरीक्षणांतून गैरकारभार सिद्ध केला. त्यातून भ्रष्टाचार करणार्‍या कारभार्‍यांवर पंधराशे कोटी रुपयांचा भार-अधिभार लावण्यात आलेला आहे.  परंतु त्याची महापालिकेकडून अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच भाजपची सत्ता आल्यापासून अनेकवेळा नगरविकास खात्याचे उंबरठे झिजवले. मात्र सत्तेसाठी हापापलेल्या मंडळींनी अर्जांना केराची टोपली दाखविली आहे. 

ते म्हणाले, आता मात्र निवडणूक आल्यावर भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना जाग आली आहे.  ते महापालिकेतील भ्रष्टाचार खणून काढणार असल्याची वल्गना करीत आहेत. मात्र त्यांचा हा दिखाऊपणा आहे. आम्ही इतकी वर्षे पाठपुरावा करीत असताना भाजपसह सर्व राजकीय पक्ष भ्रष्ट कारभारावर मूग गिळून का गप्प बसले?बर्वे म्हणाले,   गेल्या चार वर्षांपासून जिल्हा सुधार समितीने भ्रष्ट कारभाराविरोधात लढा उभारला आहे. त्यांचे शिलेदार मोठ्या ताकदीने गैरकारभाराविरोधात लढत आहेत.  मात्र महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी आयात करून भाजप सत्तेचे स्वप्न बघत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत होणार्‍या प्रचारसभेतून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांची पाठराखण करणार्‍या भाजपच्या भ्रष्ट कारभाराचापंचनामा जनतेसमोर मांडणार 
आहे.