Wed, Nov 21, 2018 20:12होमपेज › Sangli › भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून पैसे घेऊन उमेदवारी

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून पैसे घेऊन उमेदवारी

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 11:37PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी बहुसंख्य उमेदवार  पैसे घेऊन उभे केले  आहेत. ते शिवसेनेच्या निष्ठावंत आणि सक्षम उमेदवारांसमोर टिकणार नाहीत. येथील जनता त्यांना धडा शिकवेल, असा आरोप  खासदार गजानन किर्तीकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान शिवसेनेचा प्रचार प्रारंभ येथील गणपती मंदिरापासून शक्तीप्रदर्शनाने झाला. खासदार किर्तीकर, संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील,  जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार,  नगरसेवक शेखर माने, संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, शंभूराज काटकर  आणि सर्व उमेदवार उपस्थित होते. 

खासदार किर्तीकर म्हणाले, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक महत्वाची आहे. रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे आम्ही पाहत आहोत. काँग्रेसच्या कारभारामुळे  या महापालिकेची दुरावस्था झाली आहे. नागरिकांना सुविधा नाहीत. आम्हाला दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत महापालिका चालवण्याचा अनुभव आहे. तेथील कारभार उत्तम  सुरू आहे. मुंबईप्रमाणे सांगलीचा विकास करण्याचा आमचा मानस आहे. या निवडणूक प्रचारात आम्ही काँग्रेस- राष्ट्रवादीने केलेल्या कारभाराचा पंचनामा  करणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपची कार्यपद्धती लोकांना आता कळाली आहे. अनेकांना त्यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिलेली आहे. तुलनेत आमचे उमेदवार हे पक्षाशी निष्ठावंत आणि सामाजिक बांधिलकी असणारे  आहेत. त्यामुळे पैशाचे व्यवहार करून आलेले विकास कसे करणार?खासदार किर्तीकर म्हणाले, या निवडणुकीत आम्ही 51  सक्षम उमेदवार उभे केले आहेत. त्याशिवाय भाजप, राष्ट्रवादीतून आलेल्या सहा जणांना पुरस्कृत केले आहे. जनतेच्या विकासाचा वचननामा आम्ही जाहीर करणार आहोत. विकासाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान दूध आंदोलनास शिवसेनेचा पाठींबा आहे, असेही खासदार किर्तीकर यांनी सांगितले.   प्रा. बानुगडे पाटील म्हणाले, पक्षाच्या प्रचाराचे नियोजन झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम आदि नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. 

आमदार अनिल बाबर नाराज नाहीत : कीर्तीकर

खासदार किर्तीकर म्हणाले, आमदार बाबर यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. ते पक्षाशी बांधील आहेत. त्यांच्या मतदार संघात ते सक्षमपणे काम करीत असून पक्षसंघटन चांगल्या पद्धतीने मजबूत केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनामुळे ते पुणे येथील पक्षाच्या बैठकीस उपस्थित नव्हते. ते  नाराज नाहीत. 

पवार गटाचा शिवसेनेसाठी विषय संपला : कीर्तीकर

खासदार किर्तीकर म्हणाले, पवार गटाला एबीफॉर्म दिले होते. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी अडीचपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहिली. मात्र ते आले नाहीत. त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. त्यालाही त्यांनी नकार दिला. शिवसेना युवा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे पृथ्वीराज पवार यांनी सांगितले आहे. पक्षशिस्त त्यांनी मोडली आहे. त्यामुळे आमच्यासाठी त्या गटाचा विषय संपला आहे.